Tue, Mar 26, 2019 01:32होमपेज › Pune › सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी सहकार्य करार 

अंटार्क्टिक संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ विद्यापीठात शिकविणार

Published On: Jun 01 2018 2:12AM | Last Updated: Jun 01 2018 12:59AMपुणे : प्रतिनिधी 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि गोव्यातील राष्ट्रीय अंटार्क्टिक व महासागर संशोधन केंद्र (एनसीएओआर) या दोन संस्थांमध्ये एक महत्त्वपूर्ण सहकार्य करार बुधवारी झाला. या करारान्वये विद्यापीठामधील पर्यावरण शास्त्र, वातावरण व अवकाश शास्त्र, भूशास्त्र अशा विविध विभागांमध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना ‘एनसीएओआर’च्या अद्ययावत संशोधनाचा फायदा मिळणार आहे. या करारान्वये ‘एनसीएओआर’चे शास्त्रज्ञ विद्यापीठामधील विद्यार्थ्यांना शिकविणार आहेत; त्याचबरोबर दोन्ही संस्थांमधील संशोधनात्मक सहकार्य वाढीस लागणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

अंटार्क्टिक व महासागर संशोधन केंद्र (एनसीएओआर) तसेच विद्यापीठ या दोन संस्थांमधील करारास कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, प्र. कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम यांच्यासह ‘एनसीएओआर’चे संचालक डॉ. रवी चंद्रन यांच्या उपस्थितीत मान्यता देण्यात आली. यावेळी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सुरेश गोसावी, भारतीय उष्ण प्रदेशीय हवामान शास्त्र संस्थेचे (आयआयटीएम) डॉ. सचिन घुडे, डॉ. दिलीप चाटे आणि डॉ. पंडिथुराई हे शास्त्रज्ञदेखील उपस्थित होते.

या करारानुसार विद्यापीठ व एनसीएओआर संबंधित क्षेत्रांमधील संशोधन व विकास आणि प्रशिक्षणाची प्रक्रिया अधिक सक्षम करण्यासाठी परस्पर सहकार्य करतील. याचबरोबर, या करारान्वये ‘एनसीएओआर’मधील इच्छुक उमेदवारास विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षणासहितच ‘पीएच.डी’ही करता येईल, विद्यापीठामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना एनसीएओआर येथे उन्हाळी इंटर्नशिप व संशोधन प्रकल्प (रिसर्च प्रोजेक्ट्स) करता येतील, विद्यापीठामधील अध्यापकांनाही एनसीएओआर येथे पोस्ट डॉक्टरेट प्रकल्प करता येतील. एनसीएओआर व विद्यापीठातील संबंधित विभागांमधील अध्यापकांमधील ज्ञानाची देवाणघेवाण वाढविली जाईल. याचबरोबर, एनसीएओआरकडून आर्क्टिक, अंटार्क्टिक व हिमालयामध्ये वेळोवेळी राबविल्या जात असलेल्या अभ्यास मोहिमांमध्येही सहभागी होण्याची संधी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे.