Thu, Jun 27, 2019 15:43होमपेज › Pune › ‘मेट्रो’मुळे नाशिक फाटा ‘सिग्‍नल फ्री’ नाही

‘मेट्रो’मुळे नाशिक फाटा ‘सिग्‍नल फ्री’ नाही

Published On: Apr 07 2018 1:38AM | Last Updated: Apr 06 2018 11:28PMपिंपरी : मिलिंद कांबळे

पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील दापोडी ते निगडी हा ग्रेडसेपरेटर मार्ग ‘सिग्नल फ्री’च्या नियोजनास पुणे मेट्रोच्या कामांमुळे अडसर निर्माण झाला आहे. नाशिक फाटा चौकातील रॅम्प वाहतुकीस खुला करूनही जोपर्यंत मेट्रोचे काम संपत नाही, तोपर्यंत हा चौक सिग्नल फ्री करण्यात येणार नाही. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेसह वाहनचालकांना आणखी किमान चार वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

कासारवाडीतील नाशिक फाटा चौकातील पिंपळे गुरव-भोसरी उड्डाणपुलावरून पिंपरीच्या दिशेने जाणार्‍या रॅम्पचे काम जागा ताब्यात नसल्याने रखडले होते. पालिकेने कायदेशीर लढा देऊन जागा ताब्यात घेऊन रॅम्पचे शिल्‍लक राहिलेले काम वेगात केले आहे. लवकरच हा रॅम्प वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. पाठोपाठ पिंपळे-गुरव उड्डाणपुलावरून चौकात उतरणारा ‘लुप’ही वाहतुकीस खुला केला जाणार होता. त्यामुळे चौकात दुभाजक टाकून हा ‘सिग्नल फ्री’ चौक करण्याचे पालिकेचे नियोजन होते. 

मात्र, मोरवाडी, पिंपरी ते दापोडीपर्यंत पुणे मेट्रोचे काम वेगात सुरू आहे. त्या कामासाठी ग्रेडसेपरेटरची एक्सप्रेस लेन वाहतुकीस बंद केली आहे.  परिणामी, सर्व्हिस लेनवर वाहतूक वाढून ती संथ झाली आहे. महारेल मेट्रो कॉर्पोरेशन लिमिटेडचे 2021 मध्ये पिंपरी-स्वारगेट मेट्रो वाहतूक सुरू करण्याचे नियोजन आहे.

सध्या सुरू असलेले मेट्रोचे काम आणि निर्माण होणारी वाहतूक समस्या लक्षात घेऊन पालिकेने सध्या तरी नाशिक फाटा चौक सिग्नल फ्री करण्याचा निर्णय बासनात बांधून ठेवला आहे. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यांचा विचार केला जाईल, असे अधिकार्‍यांनी सांगितले.या चौकात मेट्रोच्या वतीने ‘मल्टिट्रान्स्पोर्ट हब’ तयार केले जाणार आहे. रस्ता, रेल्वे, मेट्रो, बस आणि खासगी प्रवासी वाहतुकीची सांगड घालून हे हब उभारले जाणार आहे.

दरम्यान, कासारवाडीहून पिंपळे गुरव उड्डाणपुलावर जाण्यासाठी असलेला रॅम्प वाहतुकीसाठी सुरू करून अर्ध्यापेक्षा अधिक वर्षे लोटले आहेत. त्या रॅम्पला वाहनचालकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

वाहतूक पोलिसांच्या सहमतीने निर्णय

नाशिक फाटा चौकातील पिंपरीच्या दिशेने उतरणार्‍या रॅम्पचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच तो वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. मात्र, मेट्रोचे काम सुरू असल्याने वाहतुकीची समस्या वाढली आहे. वाहतूक पोलिसांसोबत झालेल्या चर्चेनंतर सध्या हा चौक ‘सिग्नल फ्री’ न करण्याचा निर्णय झाला आहे. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर तो सिग्नल फ्री केला जाईल, असे पालिकेच्या बीआरटीएस विभागाचे प्रवक्ते विजय भोजने यांनी सांगितले. 

 

Tags : Pimpri, Pimpri news, Nashik Phata, signal, metro,