होमपेज › Pune › नाणोली तर्फे चाकण ते वराळे  जीव मुठीत धरून प्रवास

नाणोली तर्फे चाकण ते वराळे  जीव मुठीत धरून प्रवास

Published On: Jun 29 2018 12:57AM | Last Updated: Jun 28 2018 10:59PMइंदोरी : ऋषिकेश लोंढे

मावळ तालुक्यातील नाणोली तर्फे चाकण ते वराळे  इंद्रायणी नदीवर पूल नसल्याने गेल्या तीन पिढ्यांपासून या गावांतील शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून इंद्रायणीच्या नदीपात्रातून निकामी झालेल्या होडीतून प्रवास करावा लागतो आहे.इंद्रायणीच्या अलीकडे - पलीकडे जाण्यासाठी होडी म्हणजे या दोन गावांना जोडणारा दुवा आहे. नाणोली तर्फे चाकण गावची लोकसंख्या सुमारे दीड हजार इतकी आहे. वराळे व तळेगावला जाण्यासाठी त्यांना जवळचा मार्ग म्हणून होडीचा प्रवास करावा लागतो. येथील विद्यार्थी-विद्यार्थीनी वराळे शाळेत जाण्यासाठी याच होडीचा वापर करतात. 

नाणोलीतर्फे चाकण येथील वल्हविण्याचे काम महिला करीत आहे. सोसाट्याचा वारा असो की मुसळधार पाऊस, कडाक्याची थंडी किंवा रणरणते ऊन याची पर्वा न करता ती कुटुंबीयांसाठी राबत आहे. हजारो लोकांना रोजगार मिळवून देणार्‍या तळेगाव औद्योगिक वसाहातीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वराळे ते नाणोली तर्फे चाकण गावाला होडीच्या माध्यमातून नावाडी म्हणून जोडण्याचे काम ही माऊली करीत आहे.

गेल्या 30 वर्षांपासून बेबीताई गव्हाणे ही ज्येष्ठ महिला व तिचे कुटुंब  तीनही हंगामात  नावाडी म्हणून काम करतात. दोन्ही गावाला दळण वळणाचे साधन नसल्याने त्यांना नदीतून होडीच्या साह्याने ये-जा करावी लागते. हीच होडी आपला जीव तळहातावर घेऊन फक्त बलुतेदारीवर आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह व्हावा म्हणून  गव्हाणे ह्या वल्हवत असतात. होडीची दुरवस्था झाली आहे़  जीव मुठीत घालून प्रवाशांसह ती रोज नौकेतून प्रवास करीत आहे. गेल्या दोन पिढ्यांपासून गव्हाणे कुटुंबीय ही सेवा करीत आहे. 

सरकारला जाग कधी येणार

नाणोली तर्फे चाकण - वराळे येथील इंद्रायणी नदीवर पूल उभारावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी 50 वर्षांपूर्वी केली होती . आजही ती मागणी कायमच आहे; परंतु,त्यांच्या प्रयत्नाला यश येत नाही.1985 मध्ये तत्कालीन मंत्री मदन बाफना यांनी पुलाच्या कामाचे भूमिपूजनही केले होते; परंतु अद्याप पूल झाला नाही. सध्याची होडी निकामी झाली आहे. मध्यंतरी तिची दुरुस्ती करण्यात आली होती. आता पाऊस जोर धरु लागला आहे. इंद्रायणीचे पात्र दुथड़ी भरुन वाहते, तेव्हा या होडीतूनन प्रवास करणे धोकादायक ठरते.