Fri, Apr 26, 2019 10:08होमपेज › Pune › महापालिका क्षेत्रीय कार्यालयांना गड-किल्ल्यांची नावे

महापालिका क्षेत्रीय कार्यालयांना गड-किल्ल्यांची नावे

Published On: Mar 06 2018 2:02AM | Last Updated: Mar 06 2018 1:54AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहरातील सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयांना गड-किल्ल्यांची नावे देण्यात आली आहेत. हा निर्णय नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत उपसूचनेनुसार मंजूर करण्यात आला. 
‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाचे पन्हाळगड, ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाचे पुरंदर, ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाचे सिंहगड, ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाचे रायगड, ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयाचे शिवनेरी, ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाचे देवगिरी, ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाचे सिंधुदुर्ग आणि ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाचे प्रतापगड असे नामकरण केले जाणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे गेल्या महिन्यात दिला होता. त्यानुसार सत्ताधारी भाजपने हा निर्णय घेतला आहे.  पालिकेचे प्रशासकीय कामकाज सुरळीत चालावे म्हणून 1997 मध्ये 4  प्रभाग कार्यालये सुरू करण्यात आली होती. त्यानंतर 2012 मध्ये कामकाजाच्या विकेंद्रीकरणासाठी आणखी 2 प्रभाग कार्यालयांची निर्मिती करण्यात आली. प्रभाग कार्यालयाऐवजी त्यांना क्षेत्रीय कार्यालये संबोधण्यास सुरुवात करण्यात आली. 

फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत शहरात चार वॉर्डांचा एक प्रभाग झाला. त्यामुळे प्रभागरचनेत बदल झाले. एकूण 31 प्रभाग नव्याने करण्यात आले. त्यामुळे पूर्वीच्या सहा क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत बदल झाले. त्यामुळे प्रशासकीय कामकाजात अडथळा येऊ नये; तसेच नागरी सुविधा पुरविणे सोयीचे व्हावे, यासाठी क्षेत्रीय कार्यालयांची फेररचना करून नव्या आठ कार्यालयांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यात ‘ग’ (थेरगाव शैक्षणिक संकुल) व ‘ह’ (कासारवाडी महिला आयटीआय) या नव्या क्षेत्रीय कार्यालयांची भर पडली. या नव्या क्षेत्रीय कार्यालयांचे कामकाज 9 ऑगस्ट 2017 पासून सुरू झाले. त्यासाठी स्वतंत्र क्षेत्रीय अधिकारीही नेमले गेले; तसेच क्षेत्रीय समिती अध्यक्षांची निवड करण्यात आली. सर्वच अध्यक्ष सत्ताधारी भाजपचे आहेत. या क्षेत्रीय कार्यालयांना गड व किल्ल्यांची नावे देण्यात आली आहेत.