Mon, Aug 19, 2019 05:29होमपेज › Pune › ‘आता मात्र हद्द झाली ’ शौचालयासही पालिकेने दिले नाव

‘आता मात्र हद्द झाली ’ शौचालयासही पालिकेने दिले नाव

Published On: Jul 02 2018 1:47AM | Last Updated: Jul 01 2018 10:33PMपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

’नावात काय आहे? ’असा प्रश्न शेेक्सपिअरने केला होता. पण पिंपरी चिंचवडमध्ये मात्र सर्व काही नावांसाठीच चालले असल्याची परिस्थिती आहे.  महापालिकेची अनेक उद्याने, वास्तू, चौक, रस्त्यांना नगरसेवकांच्या दिवंगत नातेवाईकांची नावे दिली गेली आहेत. हे कमी म्हणून की काय आता सुलभ शौचालयासही नाव देण्याचा हास्यास्पद प्रकार पालिकेने केला आहे. दळवीनगर येथील सुलभ शौचालयास पांढारकर चाळ सुलभ शौचालय असे नाव दिले गेले आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेची प्रेमलोक पार्क येथील  महात्मा फुले शाळा  पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी  देण्यात आली आहे. ही शाळा दळवीनगर परिसरात बांधलेल्या इमारतीत स्थलांतरीत केली आहे. परंतु,  रेल्वे मार्ग शेजारी असल्याने येथे दिवसभर रेल्वेच्या आवाजाचा ‘खडखडाट’ सुरु राहणार आहे.  त्यामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष लागणार नसल्याचे सांगत पालक आणि विद्यार्थी आंदोलन करत आहेत. नुकताच पालकांनी पालिकेवर मोर्चाही काढला शाळेचे स्थलांतर हा बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात आला होता.  या  पार्श्वभूमीवर पक्षनेते एकनाथ पवार यांनी  पत्रकारांसह नुकतीच नवीन शाळेची पाहणी केली. दळवीनगर  शाळेत अत्याधुनिक सोयी-सुविधा आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची  काळजी घेतली आहे.  पालकांच्या सूचनांचा विचार करून आवश्यक त्या सुविधा पालिकेतर्फे उपलब्ध करुन दिल्या जातील. परंतु, पालकांनी जागेचा हट्ट धरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करु नये, असे आवाहन त्यांनी केले.

या पाहणी दौर्‍यादरम्यान आसपासच्या परिसराची पाहणी करत असताना  शाळेशेजारी  पालिकेने उभारलेल्या सुलभ शौचालयाकडे सर्वांचे लक्ष गेले. पालिकेने या शौचालयास पांढारकर चाळ सुलभ शौचालय असे नाव दिल्याचे दिसून आले शौचालयासही नाव देण्याचा हट्ट पालिकेने पुरवल्याचे पाहून सर्वजण हास्यसागरात बुडून गेले. पिंपरी चिंचवड शहरातील अनेक उद्याने, पालिकेच्या वास्तू, चौक, रस्त्यांना महापुरुषांची नावे देणे अपेक्षित होते. मात्र महापालिकेच्या त्या त्या वेळच्या पदाधिकारी नगरसेवकांनी आपल्या अधिकाराचा गैरफायदा घेऊन पालिकेच्या वास्तू, रस्ते, उद्यानांना आपापल्या दिवंगत नातेवाईकांची नावे  देण्याचा सपाटाच लावला. स्थानिकांनी अनेक ठिकाणी आपल्या जागा विकासकामांसाठी दिल्याचे कारण त्यासाठी सांगितले गेले. नवनिर्वाचित नगरसेवकांच्या  नावाच्या पाट्यांनी शहरात नुसता धुमाकूळ घातला आहे. नगरसेवक.... यांच्या निवासस्थानाकडे या स्वरूपाच्या पाट्या चार ठिकाणच्या रस्त्यांवर दिसू लागल्या आहेत.  याबाबत धोरण निश्चित करण्याचा विषय कागदावरच आहे.  अन् आता तर पालिकेने दळवीनगर येथे उभारलेल्या सुलभ शौचालयासही नाव देण्याचा हट्ट पुरविल्याने ‘आता मात्र हद्द झाली’ असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.