Sat, Apr 20, 2019 23:51होमपेज › Pune › ‘एनटी’च्या सवलती नाकारल्या

‘एनटी’च्या सवलती नाकारल्या

Published On: Aug 05 2018 1:31AM | Last Updated: Aug 05 2018 12:56AMबारामती : प्रतिनिधी

राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, यासाठी धनगर समाज आक्रमक झाला असून, बारामतीसह इतर तालुक्यातील समाजबांधवांनी शनिवारी (दि. 4) बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौकात एकत्र येत भटक्या विमुक्त जातीच्या (एनटी) सवलती नाकारून जातीचे प्रमाणपत्र शासनाकडे सुपूर्द केली. या वेळी आरक्षण मिळेपर्यंत शांततेच्या मार्गाने वाटचाल करण्यासाठी समाज बांधवांना शपथ देण्यात आली. 

आतापर्यंत शासनाकडून धनगर समाजाला भटक्या विमुक्त जातीच्या सवलती देण्यात येत होत्या. आदिवासी धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने संपूर्ण राज्यात शांततेच्या मार्गाने लढा उभारण्यात येणार आहे. आरक्षण मिळेपर्यंत हा लढा चालूच राहणार असल्याची माहिती धनगर प्रबोधन संघाचे राज्य अध्यक्ष गोविंदराव देवकाते यांनी या वेळी दिली. 

याप्रसंगी गोविंदराव देवकाते, डॉ. जी. बी. गावडे, डॉ. रमेश कोकरे, मदनराव देवकाते, कल्याणी वाघमोडे, नगरसेविका कमल कोकरे, नीलिमा मलगुंडे, शारदा मोकाशी, किशोर मासाळ, संजय देवकाते, ड.अमोल सातकर, सनी देवकाते, संपतराव टकले तसेच शासनाचे प्रतिनिधी म्हणून नायब तहसीलदार अनिल ठोंबरे यांच्याकडे धनगर समाज बांधवांनी जातीचे प्रमाणपत्र सुपूर्त करण्यात आले.

राज्यात 14 टक्के असणार्‍या धनगर समाजाला केवळ साडेतीन टक्के भटक्या विमुक्तांच्या सवलती मिळाल्या असल्याने समाजाची फसवणूक झाली असल्याची भावना समाजातील कार्यकर्त्यांची झाली असून समाजात मोठी खदखद वाढत आहे. राज्य शासन धनगर समाजावर अन्याय करत असल्याची भावना यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली. गोविंदराव देवकाते यांनी यावेळी आरक्षणाची पुढील दिशा आणि योजना स्पष्ट केली. शपथविधी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंकज देवकाते, नितीन देवकाते, नवनाथ मलगुंडे, ज्ञानदेव खामगळ, नवनाथ बोरकर, अमोल चोपडे यांनी प्रयत्न केले.