Tue, Mar 19, 2019 09:59होमपेज › Pune › महापालिकेचे वीज बचतीचे धोरण

महापालिकेचे वीज बचतीचे धोरण

Published On: Jul 11 2018 1:38AM | Last Updated: Jul 10 2018 11:57PMपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

पिंपरी -चिंचवड महापालिकेने वीज बचतीच्या दृष्टीने पावले उचलत त्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत. मुख्य प्रशासकीय इमारतीतील 50 ठिकाणी  बसविलेले सेन्सर तसेच सौरऊर्जा निर्मिती उपकरणे याची साक्ष देत आहेत.पिंपरी- चिंचवड महापालिका ही आशिया खंडातील श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते.  या महानगरपालिकेने इतरांसाठी आदर्शवत ठरतील असे सारथी सारखे उपक्रम राबविले आहेत. अशा कौतुकास्पद उपक्रमात वीज बचत धोरणाचाही समावेश आहे.

पालिकेने वीज बचतीसाठी कर्मचार्‍यांची मानसिकता तयार करण्याच्यादृष्टीने ठिकठिकाणी सूचना फलक लावले आहेत. चालू असलेल्या अनावश्यक लाईट, फॅन, एसी बंद करावेत, कार्यालय बंद करताना सर्व लाईट व वातानुकूलित यंत्रणा (एसी) संपूर्ण बंद  केले आहेत.  याची खात्री करूनच कार्यालय बंद करावे असे आवाहन करण्यात आले आहे.वीज बचतीच्या दृष्टीने महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये अधिकारी, पदाधिकार्‍यांच्या कॅबिन, टॉयलेट आदी ठिकाणी एकूण 50 सेन्सर बसविण्यात आले आहेत  माणूस आत असेल तरच लाईट चालू रहावी अशी यंत्रणा बसवली आहे. केंद्र सरकारने 24 डिग्री सेंटिग्रेडलाच एसी वापरण्याचे आदेश देत उत्पादकांना तसे बंधनकारक केले आहे. पिंपरी- चिंचवड महापालिकेतील एसी जुने आहेत.  त्यामुळे एसी 24 डिग्री सेंटिग्रेड पर्यंतच ठेवावेत असे तोंडी आदेश देण्यात आले असून याबाबतचे परिपत्रक लवकरच काढण्यात येणार आहे 

वीज बचतीसाठी महापालिकेने एलईडी बसविण्याचे धोरण अवलंबले आहे. मुख्य प्रशासकीय इमारतीवर 50 किलोवॅटचे सौर ऊर्जा निर्मिती उपकरण बसविले आहे. 50 किलोवॅटचे आणखी एक सौर ऊर्जा उपकरण बसविण्यात येणार असून निविदा काढण्यात आली आहे.महापालिकेच्या ई क्षेत्रीय कार्यालय इमारतीवर 10 किलोवॅटचे सौर ऊर्जा उपकरण बसविले आहे. ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय इमारतीवर असे उपकरण बसविण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. भविष्यात महापालिकेच्या सर्व इमारतींवर सौर ऊर्जा उपकरण बसविण्यात  येणार आहे, तसेच महापालिकेच्या विविध ठिकाणी असलेल्या कार्यालयांमध्ये वीज बचतीच्यादृष्टीने सेन्सर बसविण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या विद्युत विभागाचे सहशहर अभियंता प्रवीण तुपे यांनी ‘पुढारी’शी बोलताना दिली. एकूणच वीज बचतीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचे चाललेले प्रयत्न स्तुत्य आहेत मात्र, या प्रयत्नात पालिकेचे पदाधिकारी, कर्मचारी, नगरसेवकांचे पालिकेत येणारे कार्यकर्ते कितपत सहभागी होतात यावरच वीज बचत धोरणाचे यशापयश ठरणार आहे.