Tue, May 21, 2019 22:11होमपेज › Pune › कचराप्रकरणी महापालिकेला फटकारले

कचराप्रकरणी महापालिकेला फटकारले

Published On: Jul 18 2018 1:54AM | Last Updated: Jul 18 2018 1:28AMपुणे : प्रतिनिधी 

उरूळी देवाची कचरा डेपो येथील 2.5 मेट्रीक टन कचर्‍याचे व्यवस्थापनाबाबत कृती आराखडा दाखल न केल्याप्रकरणी राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाने (एनजीटी) महापालिकेला फटकारले आहे. याप्रकरणी महापालिका आयुक्‍तांना  2 कोटी रूपये दंड आकारण्याचा इशारा  न्या. सोनम वांगडी आणि डॉ. नगीन नंदा यांच्या न्यायाधीकरणाने दिला आहे. 

पुण्यातील उरूळी देवाची कचरा डेपो संदर्भात एनजीटीमध्ये ग्रामस्थ भगवान भाडळे, विजय भाडळे यांच्या वतीने अ‍ॅड. असीम सरोदे यांनी ही याचिका दाखल केली होती. याचिकेवर सकारात्मक मार्ग काढण्यासाठी एनजीटीने एका बैठकीचे आयोजन केले होते. पुण्यात निर्माण होणारा कचरा व त्यावर होणारी प्रक्रिया घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 नुसार नसल्याचा निष्कर्ष न्यायाधीकरणाने काढला होता. उरूळी येथे जमा होणारा कचरा, कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी लागणारा कालावधी या सगळ्यांच्या नियोजनाबाबत पालिकेने कृती आराखडा सादर करावा, असा आदेश नोव्हेंबर 2017 रोजी दिला होता. 

पालिकेने उरूळीदेवाची कचराप्रश्‍नी कायदेशीर मार्ग न काढता राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या आदेशाचे उल्‍लंघन करीत असल्याचे न्यायालयाने नमूद करताना पालिकेच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्‍त केली आहे. नोव्हेंबर 2017 रोजी उरूळी देवाची कचरा डेपो असलेल्या जागेवर प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे, याचिका प्रलंबित काळात परिस्थितीत कोणता बदल झाला याबाबत पालिकेने सादरीकरण केले होते. त्यानंतर एनजीटीने किती प्रमाणात कचर्‍याचे वर्गीकरण होते, दररोज किती कचर्‍याची निर्मिती होते, डेपोचे किती भूक्षेत्र कचरा जमा करण्यासाठी वापरले जाते, ही जमीन वापरतांना घनकचरा व्यवस्थापन नियम पाळले जावेत म्हणून कोणती काळजी घेतली गेली, अशा विविध मुद्यांवर कृती आराखडा सादर करण्याचे आदेश न्यायाधीकरणाने दिले होते. परंतु, पालिकेने कृती आराखडा सादर न केल्याने एनजीटीने फटकारले आहे. याचिकेवरील सुनावणी बुधवारी (दि.18) होणार आहे.