Sun, Jul 21, 2019 10:04होमपेज › Pune › राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाने विकल्या पूररेषेतील जमिनी

राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाने विकल्या पूररेषेतील जमिनी

Published On: Jan 17 2018 2:02AM | Last Updated: Jan 17 2018 12:55AM

बुकमार्क करा
पिंपरी/नवी सांगवी : प्रतिनिधी

पिंपळे गुरवमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका माजी नगरसेवकाने पूररेषेतील जमिनींची अनधिकृत व्यवहाराद्वारे विक्री केली असून त्याच जागांवर आज मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत. तसेच, त्यांना अभय मिळत आहे. ही अनधिकृत बांधकामे करण्यासाठी संबंधित नागरिकांकडून लाखो रुपयांचा हप्ता गोळा केला गेला आहे, असा आरोप स्थायी समितीचे माजी अध्यक्षा राजेंद्र राजापुरे यांनी केला आहे.

त्या माजी नगरसेवकाने महार वतनाच्या जमिनींचीही परस्पर विक्री केली आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामांना भाजपाकडून अभय मिळत असल्याचे या माजी नगरसेवकाने सांगणे म्हणजे चोराने उलट्या बोंबा मारण्यासारखा प्रकार आहे. पूररेषेतील जमीन विक्रीतून नागरिकांची झालेली आर्थिक फसवणूक आणि महार वतनाच्या जमिनींची परस्पर विक्रीची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राजापुरे यांनी केली आहे. 

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी पिंपळे गुरव, सांगवी व नवी सांगवी परिसरात भाजपच्या शहराध्यक्षांच्या पाठबळामुळे मोठ्या संख्येने अनधिकृत व्यावसायिक बांधकामे होत असल्याचा आरोप रविवारी (दि.14) पत्रकार परिषदेत पुराव्यानिशी केला होता. त्याला उत्तर देत राजापुरे यांनी निवेदन  प्रसिद्धीस दिले आहे. त्यांनी राजेंद्र जगताप यांचे नाव न घेता त्यांच्यावर आरोप केले आहेत. राजापुरे यांनी निवेदनात म्हटले आहे की, पिंपळे गुरवमधील एका माजी नगरसेवकाने आपल्या प्रभागात अनधिकृत बांधकामे करणार्‍या नागरिकांकडून सर्रासपणे हफ्ते गोळा केले आहेत. त्यांची प्रभागात दहशत असल्यामुळे नागरिकांनाही आपले बांधकाम करण्यासाठी हफ्ते देण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळे असंख्य गोरगरीब नागरिकांकडून अनधिकृत बांधकामांसाठी हफ्ते घेत या माजी नगरसेवकाने लाखोंची माया गोळा केली आहे.  या माजी नगरसेवकाबाबत नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आणि चीड होती. त्यामुळे महापालिका निवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढविलेल्या त्यांना मतदारांनी घरी बसविले.

त्यांनी पिंपळे गुरव व सांगवी भागातील पूररेषेतील अनेक जमिनींची बेकायदेशीरपणे विक्री केली आहे. नागरिकांनी जमिनी खरेदी केल्यानंतर संबंधित जागा ही पूररेषेत असल्याचे लक्षात आले; परंतु या माजी नगरसेवकाची प्रभागात दहशत असल्यामुळे नागरिकांनी  त्याबाबत कोणाकडे तक्रार केलेली नाही, असा 
आरोप राजापुरे यांनी केला आहे.