Sun, Jul 21, 2019 09:52होमपेज › Pune › ‘स्थायी’साठी राष्ट्रवादीचे 21 इच्छुक

‘स्थायी’साठी राष्ट्रवादीचे 21 इच्छुक

Published On: Feb 18 2018 2:01AM | Last Updated: Feb 18 2018 1:36AMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या 2 सदस्य पदांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे  तब्बल 21 नगरसेवक इच्छुक आहेत. त्यामध्ये दोन माजी महापौर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व सदस्यांचाही समावेश आहे. 

स्थायी समितीच्या 8 सदस्यांचा एका वर्षाचा कार्यकाळ 28 फेबु्रवारीला संपत आहे. त्या 8 सदस्यांची नावे चिठ्ठ्या काढून जाहीर करण्यात आली. त्यात भाजपचे 6 व राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 सदस्यांची नावे आल्याने ते निवृत्त होणार आहेत. राष्ट्रवादीचे वैशाली काळभोर व अनुराधा गोफणे या दोघी सदस्या बाहेर पडणार आहेत. त्यांच्या जागी सदस्य म्हणून इच्छुक असलेल्या नगरसेवकांकडून राष्ट्रवादीने 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागविले होते.

त्यास तब्बल 21 नगरसेवकांनी प्रतिसाद देत सदस्यपदासाठी दावेदारी केली आहे. त्यात माजी महापौर अपर्णा डोके व डॉ. वैशाली घोडेकर, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सुमन पवळे; तसेच माजी विरोधी पक्षनेते श्याम लांडे व विनोद नढे, जावेद शेख, राजू बनसोडे, संतोष कोकणे, रोहित काटे, पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, राहुल भोसले, गीता मंचरकर, प्रज्ञा खानोलकर, सुलक्षणा धर, पौर्णिमा सोनवणे, निकिता कदम, स्वाती काटेे, विनया तापकीर, उषा काळे, संगीता ताम्हाणे यांचा समावेश आहे. यांपैकी केवळ दोन नगरसेवकांची नावे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहमतीने मंगळवारी (दि. 20) होणार्‍या सर्वसाधारण सभेत सादर केली जातील, असे विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी शनिवारी (दि.17) सांगितले.

दरम्यान, सत्तारूढ भाजपच्या वतीने चिठ्ठीतून निवृत्त झालेल्या समिती अध्यक्षा सीमा सावळे, हर्षल ढोरे, कुंदन गायकवाड, उषा मुंढे, कोमल मेवानी,आशा शेंडगे यांच्या जागी 6 जणांची नावे सर्वसाधारण सभेत सादर केली जाणार आहेत. इच्छुक नगरसेवकांकडून भाजपने अर्ज मागविले नाहीत. पक्षाच्या कोअर कमिटीच्या सहमतीने ही नावे निश्‍चित केली जाणार आहेत. त्यामध्ये भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप समर्थक नगरसेवकांना झुकते माप दिले जाणार असल्याचे संकेत आहेत; तसेच पक्षाने पक्षाच्या 10 व अपक्ष 1 अशा 11 सदस्यांचे राजीनामे घेऊन ठेवले आहेत. तांत्रिक कारणामुळे उर्वरित 5 सदस्यांचे राजीनामे 28 फेबु्रवारी किंवा त्यानंतर देण्यात येणार आहेत. त्यापुढे 5 नगरसेवकांची निवड सदस्य म्हणून केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. 

सदस्यपदासाठी  जोरदार ‘फिल्िंडग’
महापालिकेच्या आर्थिक कारभारावर म्हणजेच तिजोरीच्या चाव्या स्थायी समिती सदस्यांच्या हातात असतात. त्यामुळे भाजप व राष्ट्रवादीचे नगरसेवक या पदासाठी तीव्र इच्छुक आहेत. त्यासाठी स्थानिक नेतेमंडळी व पदाधिकार्‍यांसह राज्यपातळीवरील नेत्यांकडे मोर्चेबांधणी करून आपली नावे निश्‍चित करण्यासाठी इच्छुक नगरसेवक व्यस्त आहेत. वर्षभरावर लोकसभा व विधानसभा निवडणुका असल्याने आपल्या मर्जीतील नगरसेवक निवडीवर स्थानिक नेतेमंडळींचा कल असणार आहे.