Thu, Jul 18, 2019 02:26होमपेज › Pune › ‘सोशल मीडिया’वर राष्ट्रवादीचाच बोलबाला

‘सोशल मीडिया’वर राष्ट्रवादीचाच बोलबाला

Published On: May 06 2018 1:54AM | Last Updated: May 06 2018 12:55AMपिंपरी : संजय शिंदे

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका 2019 मार्च ते जूनदरम्यान होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांनी मोट बांधणे सुरू केले आहे. भाजपा आणि शिवसेना, काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी होणार की नाही याबाबत साशंकता असतानाच प्रत्येक पक्षाने ब्रँण्डिंग सुरू केेले आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आघाडी घेतल्याचे दिसत आहे. जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपद हाती घेतल्यानंतर राज्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांशी मुक्त संवाद साधत कार्यकर्ते  आणि नेते यांच्यातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

केंद्रात आणि   राज्यात  सत्तेत  असणार्‍या भारतीय जनता पार्टीने 2014 च्या  लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी विविध माध्यमांचा आधार घेतला होता. त्यामध्ये सोशल मीडियाचा सिंहाचा वाटा होता. तेच तंत्र सध्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून अवलंबणे सुरू केले आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मीडिया सेलची निर्मिती करुन पक्षांतर्गत राबविण्यात येणार्‍या विविध  कार्यक्रमांची माहिती सोशल मीडियावर  प्रदर्शित करण्यावर भर दिल्याचे दिसते.

भाजप सरकारविराधोत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सुरू केलेल्या हल्लाबोल  आंदोलनास सोशल मीडियाचा मोठा फायदा झाला. आंदोलनास मिळत असलेल्या प्रतिसादाची छायाचित्रे, भाषणे, लाईव्ह  व्हिडीओ राज्यातील  कानाकोपर्‍यात पोहचविण्यास  सोशल मीडियामुळे यश आले आहे.  त्याचा हल्लाबोल आंदोलनास फायदा झाला. नागरिकांनी सत्ताधार्‍यांच्या विरोधात केलेला आक्रोश राष्ट्रवादी काँग्रेसने  सोशल मीडियाने कॅच केल्याचे दिसून आले.

पुण्यात 1 मे ला माजी उपमुख्यमंत्री स्व. आर.आर.पाटील यांच्या कन्येच्या लग्नात अजित पवार पाहुण्यांचे स्वागत करताना, सुप्रिया सुळे  अक्षदा वाटताना, आ. सुमन पाटील यांना धीर देतानाचे व्हिडिओ, छायाचित्रे, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी आ. जयंत पाटील यांची निवड झाल्यानंतर  त्यांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांशी फेसबुकवरुन साधलेल्या मुक्त लाईव्ह संवादामुळे कार्यकर्त्यांमध्ये संचारलेला उत्साह असो की माजी उपमुख्यमंत्री आ. छगन भुजबळ यांना मिळालेला जामीन हा शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामुळे हे नागरिकांना समजावे म्हणून व्हायरल झालेले पत्र या बाबींचा  फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होताना दिसत आहे.  

त्याचे सर्व श्रेय जाते ते फक्त आणि फक्त सोशल मीडियाला. त्यामुळे  शरद पवार पंतप्रधानपदाचे उमेदवार त्याअनुषंगाने महाराष्ट्रात होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे महत्व, त्याचबरोबर अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, धनंजय मुंडे यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांनी व्हिडिओंना मिळत असलेला प्रतिसाद यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडियावर जोरावर असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.