Wed, Jan 22, 2020 00:59होमपेज › Pune › दस्तुरखुद्द शरद पवारांच्या भेटीने उदयनराजेंची तलवार म्यान?  

दस्तुरखुद्द शरद पवारांच्या भेटीने उदयनराजेंची तलवार म्यान?  

Published On: Sep 12 2019 4:16PM | Last Updated: Sep 12 2019 4:23PM

उदयनराजे भोसले आणि शरद पवार (संग्रहित छायाचित्र)पुणे : पुढारी ऑनलाईन

गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्टी देण्याच्या मनस्थितीत असलेल्या साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांची दस्तुरखुद्द शरद पवारांनी भेट घेऊन दोन तास चर्चा केली. या भेटीमध्ये उदयनराजेंची समजूत घालण्यात शरद पवार यशस्वी झाल्याची चर्चा आहे.   

आज (ता.१२) सर्वत्र सार्वजनिक गणेश विसर्जनाची धामधुम सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात राजेंची भेट घेतली. यावेळी पवारांसोबत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि साताऱ्यातील आमदार शशिकांत शिंदे यांचीही उपस्थिती होती. 

उदयनराजेंचा भारतीय जनता पक्षातील प्रवेश निश्चित झाल्याच्या बातम्या आहेत. परंतु, उदयनराजेंनी गेल्या काही दिवसांपासून केलेल्या वक्तव्यांवरून ते खरोखरच भाजपमध्ये प्रवेश करणार का? अशाही समांतर चर्चा सुरूच होत्या.    

शरद पवारांनी  उदयनराजेंशी दोन तास चर्चा केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुंडे म्हणाले, उदयनराजे नाराज नसून ते पक्षामध्येच आहेत. त्यांनी भाजप प्रवेशावर भाष्य केलेले नाही. माध्यमातून अशा प्रकारची चर्चा केली जात आहे. ज्वलंत मुद्यावरून लक्ष वळविण्यासाठी भाजपकडून असे प्रयत्न सुरू आहेत. या बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणूकीसाठी रणनीती ठरवण्यावर चर्चा झाली. 

उदयनराजेंच्या वैयक्तिक कामाच्या नियोजनामुळे शिवस्वराज्य यात्रेला उपस्थित राहू शकले नाहीत, असा खुलासाही मुंडे यांनी केला. खासदार उदयनराजे भोसले यांनी गेल्या मंगळवारी रात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत भाजप पक्ष प्रवेशाबाबत मुख्यमंत्र्यांशी उदयनराजेंची सुमारे दीड तास चर्चा झाली. मात्र, तरीही प्रवेशाचा निर्णय गुलदस्त्यात राहिला. 

उदयनराजे भोसले यांच्या राजकीय भूमिकेबाबत गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रात उत्सुकता लागून राहिली आहे. भाजपमध्ये प्रवेश करायचा की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहायचे, याबाबत त्यांनी समर्थकांशी चर्चा केली होती.