Thu, Apr 25, 2019 18:02होमपेज › Pune › राष्ट्रवादीकडून भाजपच्या विचारांची पाठराखण

राष्ट्रवादीकडून भाजपच्या विचारांची पाठराखण

Published On: Aug 24 2018 12:47AM | Last Updated: Aug 23 2018 10:16PMपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

आपल्या अजातशत्रू, निष्कलंक व्यक्तिमत्त्वाने भारतीय राजकारणावर स्वतःचा ठसा उमटविलेल्या माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जाण्याने अवघा देश हळहळला. भाजपची सत्ता असलेली पिंपरी पालिका थंडावली. मात्र, कचर्‍याचा प्रश्न, प्रधानमंत्री आवासवरून विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी भाजपवर हल्लाबोल केला. दुसरीकडे वाजपेयींच्या श्रद्धांजली सभेस विरोध करणार्‍या औरंगाबादमधील एमआयएमच्या त्या नगरसेवकाचे मी तर हातपाय तोडले असते, असे विधान करून राष्ट्रवादीचे नगरसेवक जावेद शेख यांनी नव्या वादास तोंड फोडले.  वाजपेयींच्या जाण्याने भाजपचे मोठे नुकसान झाले, मात्र दुखवटाकाळातच विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी भाजपला लक्ष्य केले. 

राष्ट्रवादीच्या काळात शहराला बेस्ट सिटी पुरस्कार मिळाला होता, परंतु भाजपची सत्ता आली अन् देशात नवव्या क्रमांकावर असलेले शहर स्वच्छतेबाबत 43 नंबरवर, तर राहण्यायोग्य शहरांच्या यादीत 69 व्या क्रमांकावर गेले.  स्वच्छता अभियानाच्या फक्‍त जाहिराती सुरू आहेत. प्रत्यक्षात नियोजनशून्य कारभार सुरू आहे. बेस्ट सिटीची भाजपने वेस्ट सिटी केल्याचा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान आवासवरूनही त्यांनी भाजपला घेरले. रावेत, बोर्‍हाडेवाडी व चर्‍होली येथील पंतप्रधान आवास योजनेतील बांधकामाचे दर अवाच्या सव्वा असून, यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला. तिन्ही प्रकल्पाच्या निविदा रद्द करून देशपातळीवर पुन्हा प्रसिद्ध कराव्यात, अशी मागणी साने यांनी केली. 

माजी पंतप्रधान अटलजींना श्रद्धांजलीसाठी सावरकर भवन येथे रविवारी सर्वपक्षीय सभा झाली. या वेळी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी  वाजपेयींच्या  निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहण्यास गेलेल्या स्वामी अग्निवेश यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांनी केलेला हल्ला, औरंगाबादला वाजपेयींना श्रद्धांजलीस विरोध करणार्‍या एमआयएमच्या नगरसेवकास भाजप नगरसेवकांनी केलेली मारहाण  पाहता आपण वाजपेयींच्या उदारमतवादी  विचारांचे अनुकरण करतोय का, याचे भाजपने आत्मचिंतन करावे, असा सल्ला दिला. महापालिकेची निवडणूक शिवसेनेच्या तिकिटावर लढवलेल्या भापकर यांची सेनेच्या विचारांशी झालेली फारकत यानिमित्त जाणवली.

महापालिकेच्या सभेत सोमवारी वाजपेयींना श्रद्धांजली वाहण्यात आली. या सभेत राष्ट्रवादीचे नगरसेवक जावेद शेख यांनी अटलजींच्या नेतृत्वगुणांचे कौतुक केले.  देशाने विचारवंत, कवी, अजातशत्रू असलेला हिरा गमावला आहे. त्यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व पुन्हा होणे नाही. अशा नेत्याला श्रद्धांजली वाहण्यास विरोध दर्शविणार्‍या औरंगाबाद महापालिकेतील एमआयएमच्या नगरसेवकाचा मी निषेध करतो. त्या नगरसेवकाचे मी तर हातपाय तोडले असते. एमआयएमचे अध्यक्ष ओवोसी यांना असे लोक पक्षात ठेवायचे असतील, तर त्यांनी खुशाल पाकिस्तानात जावे, अशा भावना व्यक्त केल्या. त्यांची ही भूमिका राष्ट्रभक्तांच्या मनात देशभक्तीचे स्फुल्लिंग जागवणारी  आहे.

एमआयएममुळे मुस्लिम समाजाला देशाप्रती असलेले प्रेम असे ओरडून सांगण्याची वेळ आली आहे. हे दुर्दैव आहे मात्र; जावेद शेख यांनी या विषयावर हातपाय तोडण्याची केलेली भाषा ही शिवसेना भाजपच्या विचारांशी पूरक असल्याने ती राष्ट्रवादीच्या कितपत पचनी पडणार, हा प्रश्नच आहे.