Thu, Apr 25, 2019 21:55होमपेज › Pune › राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांची उद्या पुण्यात होणार घोषणा

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांची उद्या पुण्यात होणार घोषणा

Published On: Apr 28 2018 1:45AM | Last Updated: Apr 28 2018 1:35AMपुणे : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी येत्या रविवारी (दि. 29) पुण्यात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख नेतेमंडळी या वेळी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा होणार असून, प्रदेशाध्यक्ष पदासाठी जयंत पाटील यांचे नाव आघाडीवर आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. त्यामुळे आता नवीन प्रदेशाध्यक्ष व इतर पदाधिकार्‍यांची निवड केली जाणार आहे. त्यासाठी पुण्यातील गुलटेकडी येथील निसर्ग मंगल कार्यालयात रविवारी दुपारी एक वाजता बैठक होणार आहे. प्रदेशाध्यक्षपदासाठी माजी मंत्री जयंत पाटील, शशिकांत शिंदे, दिलीप वळसेपाटील यांच्यासह विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची नावे चर्चेत आहेत. यामधील एका नावावर बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे. या वेळी संपूर्ण राज्यातून राष्ट्रवादीचे एक हजार प्रतिनिधी उपस्थित राहणार असून, त्यात शरद पवार हे सध्याच्या राजकीय स्थितीवर मार्गदर्शन करणार आहेत.

दरम्यान, प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी आयोजित बैठकीसाठी अध्यक्ष सुनील तटकरे, प्रदेश प्रमुख निवडणूक अधिकारी दिलीप वळसे पाटील, अजित पवार, धनंजय मुंडे, जयंत पाटील, गणेश नाईक, मधुकर पिचड, अरुण गुजराथी, भास्कर जाधव, सचिन आहेर, जयदेश क्षीरसागर, फौजिया खान, सुप्रिया सुळे, चित्रा वाघ, अनिल देशमुख ही नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत.