Wed, May 22, 2019 14:19होमपेज › Pune › ‘सोशल मीडिया’वरून राष्ट्रवादीचा सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल

‘सोशल मीडिया’वरून राष्ट्रवादीचा सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल

Published On: Mar 03 2018 1:45AM | Last Updated: Mar 03 2018 1:40AMपिंपरी :संजय शिंदे

 महापालिका निवडणुकीत 2017 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पंधरा वर्षांच्या सत्तेला भारतीय जनता पार्टीने सुरूंग लावला. हा पराभव पचनी न पडल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी विजनवासात गेले होते; मात्र पालिकेत भाजप करीत असलेल्या भ्रष्ट कारभारावर राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या दोन महिन्यांपासून हल्लाबोल सुरू केला आहे. निवडणुकीमध्ये दिलेली आश्‍वासने पूर्ण न करता पारदर्शक कारभाराच्या नावाखाली पालिकेत भाजपने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. त्याच्यावर हल्लाबोल करीत राष्ट्रवादीने सोशल मीडियाद्वारे भाजपवर शरसंधान साधने सुरू केल्याने शहरात याची जोरदार चर्चा आहे.

प्रामुख्याने या स्लोगनमध्ये पाणी बिलातील वाढ, शास्तीकराची वसुली आणि कचर्‍यातून कमाई, लोकांच्या खिशाला चटका अन् सत्ताधार्‍यांना सरकारी तिजोरी लुटायची घाई..., शूऽऽऽ काही बोलायचे नाही, सरकार पारदर्शक आहे, अडकले लालफितीत संत ज्ञानदेव-संत नामदेव शिल्प, गप्पा विकासाच्या मात्र, मार्गी लागेना देवाचाही प्रकल्प..., शूऽऽऽ काही बोलायचे नाही, सरकार पारदर्शक आहे,  विरोधकांचा आवाज दाबला, सभाशास्त्रात दिसेना लोकशाही, सत्तेच्या धुंदीत रेटून अवतरली पेशवाई..., शूऽऽऽ काही बोलायचे नाही, सरकार पारदर्शक आहे, निवणूक जिंकण्यासाठी घेतला मराठी अस्मिता अन् शिवछत्रपतींचा आधार, सत्तेत येताच थांबविले भोसरी शिवछत्रपती-राजमाता प्रवेशद्वार..., शूऽऽऽ काही बोलायचे नाही, सरकार पारदर्शक आहे, अशा अनेक राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात मंजूर झालेल्या विकासकामांबाबतीत भाजप सत्ताधार्‍यांनी पिंपरी-चिंचवड शहरात जाणूनबुजून राजकारण केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने हल्ला सुरू केला आहे. प्रत्येक विभागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांचे छायाचित्र त्यावर टाकून भाजपने सूडबुद्धीने थांबविलेल्या विकासकामांबरोबर राज्यस्तरावरही सुरू असलेल्या फसवणुकीवर छायाचित्रांद्वारे (फ्लेक्स) राष्ट्रवादीकडून निशाणा साधला जात आहे. 

या फ्लेक्सवर शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांचे फोटो टाकून त्यांच्या तोंडावर लालपट्टी लावल्याचे दिसत आहे. त्यातून शूऽऽऽ काही बोलायचे नाही, सरकार पारदर्शक आहे, असा खोचक टोमणा मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याच सोशल मीडियाचा वापर करून राष्ट्रवादीच्या काळात भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप भाजपकडून होत होता. त्याच हत्याराचा वापर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी सुरू केल्यामुळे याची जोरदार चर्चा पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात आहे.