Mon, Jun 17, 2019 03:10होमपेज › Pune › पुण्यावर राष्ट्रवादीचा पुन्हा दावा; काँग्रेस म्हणते ‘घोडा मैदान जवळच’

पुण्यावर राष्ट्रवादीचा पुन्हा दावा; काँग्रेस म्हणते ‘घोडा मैदान जवळच’

Published On: May 23 2018 1:45AM | Last Updated: May 23 2018 1:43AMपुणे : प्रतिनिधी

पुण्यात आमचा मित्रपक्ष काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे. नगरसेवकांची संख्याही चौपट आहे. ज्या पक्षाची ज्या ठिकाणी जास्त ताकद, त्याची ती जागा या साध्या सरळ गणितानुसार पुण्याच्या जागेवर राष्ट्रवादीचाच हक्क असल्याचा पुनरुच्चार राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला. मात्र, काँग्रेसने यासंदर्भात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून, काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि माजी मंत्री रमेश बागवे यांनी, ‘घोडा मैदान जवळच आहे’ अशा शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त केल्याने, आघाडीत पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविण्यात येत आहे.

राष्ट्रवादीच्या शहर, जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांची आढावा बैठक मंगळवारी पुण्यात झाली. या बैठकीत पवार यांनी पुन्हा एकदा पुणे लोकसभा मतदारसंघावर दावा ठोकला. या वेळी ते म्हणाले, मध्यंतरी मी पुण्याच्या जागेसंदर्भात वक्तव्य केले होते. त्यावर मित्रपक्षाने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. मात्र, आघाडीचं गणित साधेसरळ आहे. पुण्यात राष्ट्रवादीचे 42 नगरसेवक आहे, तर मित्रपक्ष काँग्रेसचे 9 ते 10 नगरसेवक आहेत. त्यांच्यापेक्षा चौपट नगरसेवक आमचे आहेत. ही वस्तुस्थिती आहे. हाच निकष सगळीकडे असणार आहे. ज्या ठिकाणी आमच्यापेक्षा मित्रपक्षाची ताकद जास्त असेल, ती जागा आम्हाला त्यांना सोडावी लागेल, हे सरळ गणित असल्याचे स्पष्ट करीत पवार यांनी पुन्हा एकदा पुणे लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचा संदेश या निमित्ताने कार्यकर्त्यांना दिले. 

विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपने काही जागांवर एकमेकांना मदत केल्याच्या वृत्तात तथ्य नसल्याचा दावाही त्यांनी केला. या निवडणुकीसाठी राष्ट्रीय पातळीवरूनच दोन्ही पक्षात प्रत्येकी 3 जागांचे वाटप ठरले होते. त्यानुसार आम्ही आघाडीचा धर्म पाळल्याचा दावा पवार यांनी केला. जातीयवादी आणि दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणार्‍यांच्या बरोबर आम्ही कधीच जाणार नाही, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. या बैठकीला खासदार व शहराध्यक्षा अ‍ॅड. वंदना चव्हाण, जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, प्रवक्ते अकुंश काकडे, दीपक मानकर, रूपाली चाकणकर, कमल ढोले पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

हल्लाबोलच्या समारोपाला भुजबळांची उपस्थिती

पुण्यात येत्या 10 जूनला राष्ट्रवादीच्या पश्‍चिम महाराष्ट्रच्या हल्लाबोल यात्रेच्या समारोपाची सभा होणार आहे. या सभेला पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ उपस्थित राहणार असून, ते कार्यकर्त्यांना मागदर्शन करणार असल्याचे पवार यांनी या सभेत सांगितले. ही सभा सहकारनगर येथील शिंदे हायस्कूलच्या मैदानावर होणार आहे.

राष्ट्रीय अधिवेशन पुढे ढकलले

येत्या 10 जूनला राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अधिवेशन पुण्यात होणार होते. मात्र, हे अधिवेशन पुढे ढकलण्यात आले असून 23 व 24 जूनला ते होईल, अशी माहितीही पवार यांनी या वेळी दिली.