होमपेज › Pune › राष्ट्रवादीकडून चुलीवर पिठलं भाकरी करून सरकारचा निषेध

राष्ट्रवादीकडून चुलीवर पिठलं भाकरी करून सरकारचा निषेध

Published On: Jun 05 2018 5:26PM | Last Updated: Jun 05 2018 5:26PMपिंपरी: प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने गॅस दरवाढीविरोधात आज आंदोलन करण्यात आले. चुलीवर पिठलं भाकरी करुन गॅस दरवाढीचा निषेध करण्यात आला. यावेळी केंद्र, राज्य सरकारच्या विरोधात महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. 

पिंपरीतील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात नगरसेविका विनया तापकीर, संगीता ताम्हाणे, माजी उपमहापौर विश्रांती पाडाळे, पुष्पा शेळके, शकुंतला भाट, सुप्रिया पवार, जयश्री पाटील, विद्या दिसले, दिपाली देशमुख, मंगल ढगे, रंजना कराळे, गंगा धेंडे, मनिषा गटकळ, कविता खराडे, रूपाली गायकवाड, सविता धुमाळ, संगीता जाधव, शिल्पा बिडकर,मंदा पेटकर,मीनल नवले प्रीती मोकाशी आदी सहभागी झाले होते. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी चुली मांडून भाकरी करुन गॅस दरवाढीचा निषेध केला. ’गॅस दरवाढ करणा-या केंद्र, राज्य सरकारचा निषेध’, ’नागपूरचा पोपट काय म्हणतो, गॅस दरवाढ मागे नाय म्हणतो’, ’भाजपचे हेच का अच्छे दिन’, अशा घोषणा यावेळी आंदोलक महिलांनी दिल्या.

या वेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा नगरसेविका वैशाली काळभोर म्हणाल्या की, सातत्याने पेट्रोल दरवाढ होत आहे वाहतूक खर्च वाढल्याने सर्वच वस्तू महाग होत आहेत गॅस महागल्याने गृहिणींचे बजेत कोलमडले आहे .दिलेल्या आश्वासनांचा भाजपला विसर पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेही फक्त बोलण्यात पोपट आहेत हे सिद्ध झाले आहे सामान्यांनी जगायचे कसे असा सवाल त्यांनी केला.

चिंचवड गावातील चापेकर चौकातही राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने गॅस दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले. वैशाली काळभोर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात माजी महापौर अपर्णा डोके, शिक्षण मंडळाच्या माजी सदस्या लता ओव्हाळ, मनीषा गटकळ आदी महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.