Wed, May 22, 2019 11:01होमपेज › Pune › आता मशिन नको, पुर्वीप्रमाणे मतदान घ्या : पवार

आता मशिन नको, पुर्वीप्रमाणे मतदान घ्या : पवार

Published On: Jun 10 2018 9:12PM | Last Updated: Jun 11 2018 1:31AMपुणे : प्रतिनिधी

जनता आता पाठीशी राहिली नसल्याने मशिनचा वापर करून त्यातून निवडणुका जिंकायच्या, हे सूत्र हाती घेतले असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचे नाव न घेता केला. देशातील भाजप सोडून सर्व पक्षांनी एकत्र येऊन आता ईव्हीएम मशिन नको, तर पुन्हा पूर्वीप्रमाणे निवडणुका घ्या, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करू,असे आवाहन करीत त्यांनी ईव्हीएम मशिनच्या विरोधात रणशिंग फुंकले. राष्ट्रवादी काँग्रेसचा 20 वा वर्धापन दिन व पश्‍चिम महाराष्ट्रातील हल्लाबोल आंदोलनाची सांगता सभा रविवारी पुण्यात झाली. या सभेला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, धनंजय मुंडे, सुनील तटकरे, दिलीप वळसे-पाटील, खा. सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक नेते मंडळी उपस्थित होेती.

यावेळी पवार म्हणाले, एकोणीस वर्षात अनेक चढ-उतार पाहिले. सत्ता नाही म्हणून आम्ही कधी गलितगात्र झालो नाही आणि सत्ता आहे म्हणून कधी मस्तवालही झालो नाही. करायचे ते जनतेसाठी करायचे हे सूत्र राष्ट्रवादीने ठेवले. देशात आज भाजपचे राज्य आहे. कोठे कसे अत्याचार केले आहेत हे सगळ्यांनी सांगितले. म्हणून आज देशासमोर पर्याय दिला पाहिजे. त्यासाठी देशातील सर्व पक्षांच्या नेत्यांशी संवाद साधतोय, त्यास प्रतिसादही मिळतोय. राष्ट्रीय पातळीवर सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. भाजपची समाजातील काही मूठभर लोकांचे भले करण्याची जी मानसिकता आहे तिचा पराभव आपण सर्व एकत्र आलो तर निश्‍चितपणे करू शकतो.  

शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचा विक्रम झाला आहे. आम्ही सत्तेवर असताना त्या कमी करण्यासाठी 71 हजार कोटींचे कर्ज माफ केले होते. मुख्यमंत्री सांगतात आम्ही 35 हजार कोटींचे कर्ज माफ केले, पण प्रत्यक्षात पन्नास टक्केही कर्ज माफ केले नाही, कर्ज माफ करण्याची त्यांची नियतच नाही. नोटाबंदीने देशातील जनतेची कमाई उद्ध्वस्त करण्याचे काम या सरकारने केले. महागाईवर तर बोलायलाच नको. दहा रुपये वाढविले की एक रुपया कमी करायचा ही फसवणूक आहे. म्हणून भाजपाचा आलेख खाली यायला लागला आहे. दहा ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या.

त्यामधील 9 ठिकाणी त्यांचा पराभव झाला. पालघरचे यश खरे नाही. सर्व विरोधक एकत्र आले असते तर भाजपचा पराभव झाला असता. त्यामुळे लोकांचा आता यांच्यावर विश्‍वास राहिला नाही. पूर्वी मतदानावर शंका घेतली जात नव्हती. आता मात्र तुमच्या मनात मतदान केल्यानंतर शंका येते. निवडणूक आयोगाचे विधान वाचले, विरोधी पक्षांचा पराभव होतोय म्हणून मशिनला दोष दिला जातोय.  मात्र, महाराष्ट्रात आम्ही तक्रार दिली, त्यात भंडारा-गोंदियाला आम्ही निवडणूक जिंकलो, त्यानंतरही आम्ही तक्रार दिलीय. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मशिन बंद पडल्या होत्या. आयोगानेच ही माहिती दिली आहे. 

ते पुढे म्हणाले, भुजबळांनी काय गुन्हा केला? दिल्लीत सगळ्यात सुंदर वास्तू महाराष्ट्र सदनाची आहे. भुजबळांच्या नेतृत्वाखाली ती बांधली, पंतप्रधानही तेथे बैठका घेतात. ही त्यांच्या कर्तृत्वाची पावती आहे. मात्र, ती बांधणार्‍या भुजबळांना आत टाकले. ज्यांनी कामे केले त्यांनाच आत टाकण्याचे काम सुरू आहे. आता सांगितले जातेय की यांना धमकीचे पत्र मिळाले. मात्र, असे पत्र मिळाल्यावर ते वर्तमानपत्रांना सांगितले जात नाही, तर त्यासंबंधीची खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या जातात. त्यामुळे हा केवळ सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न आहे. मात्र, जनता त्यांच्यावर विश्‍वास ठेवणार नाही. त्यासाठी आता समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यासंबंधीची प्रक्रिया सुरू केली आहे. देशात आणि महाराष्ट्रात परिवर्तन करण्यासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे, असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले.

कोरेगाव भीमामधील उद्योग जगाला माहिती 

पुणे शहरात एल्गार परिषदेच्या निमित्ताने समविचारी विचाराचे लोक एकत्र आले म्हणून त्यांना नक्षलवादी ठरविता, गुन्हेगार ठरवून त्यांना अटक करता. कोरेगाव भीमामध्ये कोणी उद्योग केले हे सगळ्या जगाला माहिती आहे. पण ज्याचा संबंध नाही अशा लोकांना अटक केली, या सगळ्या गोष्टी सत्तेचा गैरवापर करणार्‍या आहेत. लोकांचा पाठिंबा राहिला नाही म्हणून हे उद्योग सुरू असल्याची टीका पवार यांनी यावेळी केली.

आपण मजुरांकडे जाऊ : धनंजय मुंडे

सत्ताधारी भाजपा पक्षाकडून त्यांच्या चार वर्षाची गाथा सेलिब्रीटी आणि उद्योगपतीपर्यंत पोहोचविण्यात येते आहे. ते चार वर्षाचे त्यांचे यश पुस्तकातून दाखवत असतील तर आपण त्यांचे अपयश एका पुस्तकाच्या माध्यमातून पोहोचवू. ते माधुरीकडे गेले तर आपण मजुरांकडे जाऊ, असा टोला धनंजय मुंडे यांनी भाजप सरकारला लगावला.

मराठा आरक्षणाला पाठिंबा 

मराठा आरक्षणाला माझा पूर्ण पाठिंबा असून, मी कधीच विरोध केला नाही. ओबीसी समाजाला बरोबर घेऊन मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मी रस्त्यावर येण्यास तयार आहे. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसंदर्भातच मी शिवसेना सोडली असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोडून कोणत्या पक्षाने आरक्षणाला पाठिंबा दिला ते सांगा. आरक्षण, नामांतर हे केवळ पवार साहेबांमुळेच झाले. - छगन भुजबळ