Mon, Jun 17, 2019 02:13होमपेज › Pune › फेसबुक पेजवरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांची बदनामी; ॲडमिनवर कारवाई करा : सुप्रिया सुळे 

फेसबुक पेजवरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांची बदनामी; ॲडमिनवर कारवाई करा : सुप्रिया सुळे 

Published On: Aug 13 2018 6:31PM | Last Updated: Aug 13 2018 6:31PMपुणे : प्रतिनिधी 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व माजी कृषिमंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांची सोशल मीडीयावरुन बदनामी होत असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. या संदर्भात सोमवारी सकाळी थेट पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांच्याकडे तक्रार केली आहे. या संदर्भातील पुरावे त्यांनी आयुक्तांकडे दिले आहेत.

फेसबुकवर हाताची घडी, तोंडावर बोट नावाचे पेज तयार करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अध्यक्ष शरद पवार यांच्यासह त्यांची मुलगी सुप्रिया सुळे, पुतणे अजित पवार आणि पक्षातील इतर वरिष्ठ नेत्यांवर खालच्या शब्दात टीका केली जात आहे. राजकीय विचारधारेतील विरोधातून टीका करण्यास कोणाचाही आक्षेप नाही. मात्र वैयक्तिक पातळीवरील बदनामीकारक टीका केली जात आहे. खोटी विधाने तयार करुन, खोटे फोटो तयार करुन संभ्रम निर्माण केला जात आहे. 

अशा खोट्या पोस्ट तयार करुन पक्षातील मान्यवर नेते शरद पवार आणि माझी बदनामी केली जात आहे. यामुळे आमच्या प्रतिमेचे हनन होत आहे. हा प्रकार गंभीर असून त्याची दखल घेत या पेजच्या अ‍ॅडमिनवर माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा. राज्याच्या माहिती तंत्रज्ञान सचिवांनी याबाबत माहिती देऊन लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सुळे यांनी पोलिस आयुक्तांकडे केली आहे.