Fri, Jul 19, 2019 17:44होमपेज › Pune › राष्ट्रवादीने केले दापोडीतील हॅरिस पुलाचे उद्घाटन

राष्ट्रवादीने केले दापोडीतील हॅरिस पुलाचे उद्घाटन

Published On: Jun 17 2018 1:37AM | Last Updated: Jun 17 2018 1:17AMपिंपरी : प्रतिनिधी

बोपोडी सिग्नल चौकात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी हॅरीस पुलास बांधण्यात येणार्‍या समांतर पुलाचे काम पुर्ण झाले आहे; परंतु काम पुर्ण झाले असून उद्घाटन केले जात नाही. त्यामुळे नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. उद्घाटनासाठी भाजप नेत्यांना वेळ नसल्याचा आरोप करत पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी  ईदच्या मुहुर्तावर हॅरीस पुल नागरिकांसाठी खुला केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांच्या हस्ते पुलाचे लोकार्पण  करण्यात आले. 

या वेळी स्थानिक नगरसेवक रोहित काटे, राजू बनसोडे, नगरसेविका माई काटे, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, कविता खराडे, व्यापारी सेलचे अध्यक्ष प्रदिप गायकवाड,सेवा दलाचे अध्यक्ष आनंदा यादव, सामाजिक न्याय विभागाच्या अध्यक्षा गंगा धेंडे  आदी कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. 

संजोग वाघेरे म्हणाले की, दापोडी येथे वर्दळीच्या काळात सुमारे 2 ते 3 किलोमीटर अंतरापर्यंत वाहने अडकून पडत आहे. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात हॅरीस पुलाला समांतर पुल बांधण्याचे काम 2016 मध्ये हाती घेतले होते.  पिंपरीकडून पुण्याला जाणार्‍या पुलाचे काम पुर्ण झाले आहे. त्यामुळे हा पुल वाहतुकासाठी खुला करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नगरसेवकांनी वारंवार महापौर, सभागृह नेत्यांकडे केली होती; परंतु उद्घाटन करण्यासाठी विलंब केला जात होता. सत्ताधार्‍यांनी 1 मे ला उद्घाटन करणार असल्याचे सांगितले. नंतर 5 व 8 मे ला उद्घाटन करण्यात येईल, असे सत्ताधार्‍यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना सांगितले. त्यानंतरही उद्घाटन झाले नाही.

पुलाचे काम पुर्ण होऊन एक महिना उलटला तरी पालकमंत्री, सत्ताधारी पक्षाचे नेते यांना वेळ नसल्यामुळे उद्घाटन केले जात नाही, हे निषेधार्ह आहे. विनाकारण लोकांना वेठीस धरले जात आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नागरिकांसाठी आज ईद च्या मुहुर्तावर हा पुल आम्ही वाहतुकीसाठी खुला केला आहे.