Mon, Apr 22, 2019 03:53होमपेज › Pune › राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘हल्लाबोल’ची शिवसेनेनेही घेतली धास्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘हल्लाबोल’ची शिवसेनेनेही घेतली धास्ती

Published On: Apr 10 2018 1:14AM | Last Updated: Apr 10 2018 1:05AMपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

राज्य सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने राज्यभर हल्लाबोल आंदोलन सुरू केले असून,  मंगळवारी (दि. 10) भोसरीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या तोफा धडाडणार आहेत. पवार यांनी भाजप बरोबरच सेनेला लक्ष्य करत ‘शिवसेना ही गांडुळाची अवलाद आहे’, ‘शिवसेनेने अर्धनारी नटेश्‍वराची भूमिका सोडावी’ या शब्दात शिवसेनेच्या वाघाला घायाळ केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या या हल्लाबोल आंदोलनाची शिवसेनेनेही चांगलीच धास्ती घेतली आहे. हल्लाबोलच्या पूर्वसंध्येला शिवसेनेने आज पत्रकार परिषद घेवून अनधिकृत बांधकामे, नियमितीकरण, शास्तीकर या जनतेच्या प्रश्‍नांवर एल्गार पुकारला, एवढेच नव्हेतर अनधिकृत बांधकामे व शास्तीकराचा निर्णय घेण्यात काँगे्रस-राष्ट्रवादी आघाडी सरकारला अपयश आल्याने तेही या प्रश्‍नास तितकेच जबाबदार असल्याचे सांगत हल्लाबोल केला.

राज्य सरकार अपयशी असल्याचे आरोप करत राष्ट्रवादीच्या वतीने राज्यभरात हल्लाबोल आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा पुढचा टप्पा पश्‍चिम महाराष्ट्रात असून कोल्हापूरातून आंदोलनाला सुरूवात झाली आहे. या आंदोलनांतर्गत उद्या दि.10 एप्रिल रोजी गाव जत्रा मैदान भोसरी व दि.11 रोजी सायंकाळी 6 वाजता. चिंचवड मतदार संघात काळेवाडी येथील एमएम शाळेसमोर राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या तोफा धडाडणार आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत व मागीलवर्षी झालेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूकीत पराभवाला सामोरे जावे लागलेल्या राष्ट्रवादीत हल्लाबोल आंदोलनामुळे चांगलाच उत्साह संचारला आहे. त्यामुळे भाजपसह शिवसेनाही अस्वस्थ आहे. 

हल्लाबोल आंदोलना दरम्यान कोल्हापूर येथे बोलताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेवर कडाडून टीका केली आहे. शिवसेना म्हणजे गांडूळाची अवलाद अशी निर्भत्सना पवार यांनी केली. त्यावर शिवसेनेनेही त्यांना प्रत्युत्तर दिले. गांडुळ हा शेतकर्‍यांना मित्र आहे, मात्र अजित पवार हे दुतोंड्या विषारी सापाची अवलाद आहे. त्यांचे शरद पवार यांनी 50 वर्षात जे कमावले ते अजित पवारांनी अल्पावदीत गमावले असून, पाणी मागणार्‍या शेतकर्‍यांना मूत्र पाजण्याची भाषा करणारे अजित पवार हा दुतोंडी साप असल्याची टीका शिवसेनेने म्हटले. यानंतरही सातार्‍याच्या सभेत अजित पवार यांनी शिवसेनेने अर्धनारी नटेश्‍वराची भूमिका सोडावी या शब्दात शिवसेनेवर हल्लाबोल चढवला. यामुळे शिवसेनेने अजित पवार यांची चांगलीच धास्ती घेतली आहे. 

हल्लाबोलच्या पूर्वसंध्येला पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेने आज पत्रकार परिषद घेवून अनधिकृत बांधकामे, नियमितीकरण, शास्तीकर या जनतेच्या प्रश्‍नांवर एल्गार पुकारला, एवढेच नव्हेतर अनधिकृत बांधकामे व शास्तीकराचा निर्णय घेण्यात काँगे्रस-राष्ट्रवादी आघाडी सरकारला अपयश आल्याने तेही या प्रश्‍नास तितकेच जबाबदार असल्याचे सांगत खा. श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. त्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती.