Wed, Jul 24, 2019 02:15होमपेज › Pune › हल्‍लाबोल... कुणाचा? कुणावर?

हल्‍लाबोल... कुणाचा? कुणावर?

Published On: Apr 08 2018 2:15AM | Last Updated: Apr 08 2018 2:15AMपुणे : दिगंबर दराडे

जिल्ह्यात 2009 च्या निवडणुकीत ‘राष्ट्रवादी’ बलाढ्य होती, पण विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला आणि घड्याळाचे ‘काटे’ मंदावले. मात्र, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा या काट्यांनी वेग धरला आणि पराभव झालेल्या तालुक्यात राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी बाजी मारली.  

राष्ट्रवादी पक्ष भाजपशी झुंज देण्यासाठी ‘हल्लाबोल’ यात्रा काढत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची ‘हल्लाबोल’ यात्रा पुण्यात दहा एप्रिल रोजी काढण्यात येत आहे. पक्षाकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे. कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त सभांना गर्दी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे बैठका घेऊन पदाधिकार्‍यांना सूचना करीत आहेत. पक्षांतर्गत लाथाळ्या, गटबाजी आणि एकमेकांवर ‘हल्लाबोल’ करण्याच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा पक्षाला कितपत ऊर्जा देणार हा प्रश्‍न महत्त्वाचा ठरणार आहे. 

विधानसभेच्या निवडणुकीत स्वतःच्या जिल्ह्यात या पक्षाच्या उमेदवारांना पराभवाचे धक्के सहन करावे लागले.  शहरात बापू पठारे, पिंपरीमध्ये विलास लांडे, विठ्ठल उर्फ नाना काटे, अण्णा बनसोडे,  शिरुरला अशोक पवार, दौंडला रमेश थोरात, जुन्नरला वल्लभ बेनके, खेडला दिलीप मोहिते-पाटील  यांना पराभवाचा सामना करावा लागला.  पक्ष स्थापनेपासून म्हणजे 1998 पासून मागील लोकसभा निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादी पक्ष पुणे जिल्ह्यात सर्वांत बलदंड समजला जायचा. अजित पवारांनी आपल्या स्वतःच्या जिल्ह्यात राष्ट्रवादीची मोट अतिशय चांगली बांधली होती. मात्र, याला  विधानसभेच्या निवडणुकीत दृष्ट लागली. पक्षातील एक-एक मोहरा पराभवाच्या छायेत गेला.  

बालेकिल्ला असलेल्या आपल्या जिल्ह्यातील सहकारी संस्थांवर पूर्णपणे अजित पवारांनी वर्चस्व मिळवून आमदारांना ताकद देण्यासाठी वाटेल ते केले. मात्र, त्यांच्या प्रयत्नाना विधानसभेच्या वेळी अपयश आले. आंबेगावमधून दिलीप वळसे-पाटील सोडले तर इंदापूरमधून एकमेव नवा चेहरा दत्‍तात्रय भरणे यांच्या रूपाने पक्षाला मिळाला. तीनच आमदारांच्यावर पक्षाला जिल्ह्यात समाधान मानावे लागले. यापाठोपाठ झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मात्र पक्षाचे पदाधिकारी सक्रिय झाले. दौंडचे रमेश थोरात यांनी पाच सदस्य निवडून आणून आपली पुन्हा एकदा ताकद दाखवून दिली. शिरुरच्या अशोक पवारांनी देखील भाजपच्या आमदार पुत्राची जिल्हा परिषदेतील वाट रोखली.  

जिल्ह्यातील हल्‍लाबोल यात्रेत शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाबरोबर सर्वच विरोधक  राष्ट्रवादीच्यापटलावर राहणार आहेत. जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादीचे प्रमुख विरोधक  अन्न, पुरवठा व संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदामंत्री विजय शिवतारे, दौंडचे आमदार राहुल कुल, माजीमंत्री हर्षवर्धन पाटील, भोरचे आमदार संग्राम थोपटे, शिरुरचे आमदार बाबूराव पाचर्णे, खेडचे आमदार सुरेश गोरे, मावळचे आमदार बाळा भेगडे, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्याविरोध ‘हल्‍लाबोल’  केला जाईल. याचबरोबर भाजपा सरकारच्या चुकलेल्या धोरणांनाही टार्गेट केले जाण्याची शक्यता आहे.