Wed, Apr 24, 2019 15:46होमपेज › Pune › सावकारी प्रकरण : राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसह चौघांचा जामीन फेटाळला

सावकारी प्रकरण : राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसह चौघांचा जामीन फेटाळला

Published On: Apr 23 2018 1:17AM | Last Updated: Apr 23 2018 1:16AMपुणे : प्रतिनिधी 

कार घेण्यासाठी उसने घेतलेले पैसे परत न केल्याने एकाला मारहाण करून ती कार परस्पर विकल्याप्रकरणी मोक्काअंतर्गत न्यायालयीन कोठडीत असलेल्या फलटण नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान नगरसेवकासह चौघांचा जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. हा आदेश विशेष मोक्का न्यायाधीश ए. एस. महात्मे यांनी दिला. 

नगरसेवक सनी संजय अहिवळे (वय 34, रा. मंगळवार पेठ, फलटण), अजित वामन जाधव (वय 35, रा. काशिळ, सातारा), संजय रामचंद्र जाधव (वय 40, रा. सोमवार पेठ, फलटण) आणि शाकीर रफीक महात (वय 34, रा. कसबा पेठ, फलटण) अशी जामीने अर्ज फेटाळण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर याप्रकरणी प्रमोद उर्फ खंड्या बाळासाहेब धाराशिवकर (वय 35, रा. विकासनगर खेड), महंमद कचूर शेख (वय 29, रा. कोयना सोसासटी, खेड), प्रमोद आप्पा मोरे (वय 42, रा. मातोश्री पार्क, सातारा, मुळ रा. बोपगाव), सचिन नरेंद्र पंडित (वय 24, रा. खेड, मुळ रा. येरवडा), अजित अशोक कुरणे उर्फ वकील उर्फ कुवड्या (रा. विकासनगर, सातारा) आणि हुसेन दस्तगीर कोतवाल उर्फ शेख (वय 32, सातारा) यांना अटक करण्यात आली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. 

नोव्हेंबर 2014 साली फिर्यादी अमिर हुसेन शेख (वय 34, रा. गोरखपूर, खेड, मूळ रा. गोडोली, सातारा) यांनी प्रमोद धाराशिवकर याच्याकडून दरमहा 10 टक्के व्याजाने इनोव्हा कार घेण्यासाठी 20 लाख रुपये उसने घेतले होते. फिर्यादी यांनी व्याजाचे 1 लाख 40 हजार रुपये धाराशिवकर याला दिले होते. मात्र मुद्दल 20 लाख रुपये दिले नाही म्हणून आरोपींनी फिर्यादी यांना त्यांच्या घरी जाऊन मारहाण केली. त्यानंतर त्यांना जबरदस्तीने इनोव्हा गाडीत बसवून सातारा आरटीओ कार्यालयात नेऊन तेथे त्यांची वाहन ट्रान्सफरच्या अर्जावर सही घेतली. त्यानंतर गाडीचा ताबा घेत तिची परस्कर विक्री करून विल्हेवाट लावली, असे फिर्यादीत म्हटले आहे. 

याप्रकरणी धाराशिवकर हा टोळीप्रमुख असून त्याला संजय जाधव, नगरसेवक अहिवळे आणि शाकीर महात यांनी सावकारी करण्यासाठी प्रत्येकी 40 लाख म्हणजे एकून 1 कोटी 20 लाख रुपये दिले होते.त्यातून तो गरजू व्यक्तींना 10 ते 15 टक्के व्याजाने पैसे देत होते असे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.  दरम्यान या प्रकरणात जामीन मिळावा म्हणून आरोपींनी अर्ज केला होता. 
त्यास विषेश सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी विरोध केला. अहिवळे हा विद्यमान नगरसेवक असून त्याचावर खुनाचा प्रयत्न, सरकारी नोकरावर हल्ला, दहशत निर्माण करणे असे गुन्हे दाखल आहेत. अजित जाधव हा धाराशिवकर यांच्या वसुलीतील साथीदार आहे. आरोपींना जामीन दिल्यास त्याचा निकालावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्यांचा जमीन फेटाळावा, असा युक्तीवाद अ‍ॅड. कावेडीया यांनी केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला.