Fri, Apr 26, 2019 02:09होमपेज › Pune › पवार यांच्या आदेशाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचा छेद

पवार यांच्या आदेशाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचा छेद

Published On: May 25 2018 1:10AM | Last Updated: May 25 2018 12:51AMपिंपरी : संजय शिंदे

महापालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस 36 नगरसेवकांसह विरोधी बाकावर बसली आहे. विरोधी पक्ष म्हणून चांगल्या कामांना पुढे घेऊन जा, नागरिकांच्या प्रश्‍नासाठी रस्त्यावर उतरा, त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करा असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी शहर राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांना दिला होता; परंतु साहेबांचा सल्ला पक्षाच्या नगरसेवकांना पचनी पडलेला दिसत नाही. भाजपाच्या विरोधात विविध आंदोलनाचे आयते कोलित मिळत असतानादेखील  हाताच्या बोटावर मोजण्या एवढेच नगरसेवक उपस्थिती लावत असल्याने पवार साहेबांच्या सल्ल्यालाच नगरसेवक छेद देत असल्याची चर्चा आहे.

पालिका निवडणुकीत भाजपची एकसंघ ताकद आणि राष्ट्रीवादीतीलकुरघोडीच्या राजकारणामुळे विरोधी बाकावर बसण्याची वेळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांवर आली. गेल्या चार वर्षात भाजपने केंद्रात आणि राज्याच्या सत्तेत जे निर्णय घेतले ते बर्‍याचअंशी नागरिकांच्या विरोधात घेतल्याची ओरड करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वर्षभरात अनेक आंदोलने घेण्यात आलीत. राज्यभर भाजपाच्या विरोधात राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन गाजले. भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात झालेल्या सभांना नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला; मात्र त्यानंतर भाजपच्या विरोधात ज्या जोशमध्ये आंदोलने होणे आवश्यक आहे ते होताना दिसत नाहीत.

शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे महिला अध्यक्षा नगरसेविका वैशाली काळभोर यांच्या नेतृत्वात अनेक जनआंदोलन घेण्यात आलीत. त्या आंदोलनाला सर्वसामान्य कार्यकर्ते, पदाधिकारी आणि 36 पैकी हाताच्या बोटावर मोजण्या एवढेच नगरसेवक उपस्थित रहात असल्याचे दिसत आहे. डॅशिंग नगरसेवक दत्ता साने यांची पालिका विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याने शहरातील आंदोलनाला जोरशोर से होतील अशी अपेक्षा पक्षातील सर्वसमान्य कार्यकर्त्यांत आहे;

मात्र ज्या पक्षाच्या चिन्हावर आपण निवडून आलो त्या पक्षाच्या आंदोलनात सहभागी होणे हे प्रत्येक नगरसेवकाचे काम आहे. प्रत्येक वेळी काही तरी कारण पुढे करुन आंदोलन टाळणे चुकीचे आहे; हे असे होत राहिले तर भविष्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकामध्ये त्याचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही अशा प्रतिक्रिया पक्षात उमटत आहेत. यावर वेळीच शहर स्तरावरील व राज्य पातळींवरील नेत्यानी लक्ष देणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.

नगरसेवकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होणे आवश्यक

साहेब व दादानी दिलेल्या आदेशानुसर आम्ही काम करत आहोत. नागरिकांच्या हिताच्या आड येणार्‍या निर्णयाविरोधात आम्ही राष्ट्रवादीच्या माध्यमातून जनआंदोलन उभी केली आहेत; पक्षाच्या माध्यमातून सर्वसामन्यांना न्याय देण्याच्यादृष्टीने प्रत्येक नगरसेवकांनी स्वयंस्फुर्तीने आंदोलनात सहभागी झाले पाहिजे. प्रभागातील प्रश्‍नांसाठी आवाज उठविला पाहिजे.   - संजोग वाघेरे-पाटील, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस