Tue, Apr 23, 2019 22:45होमपेज › Pune › बारामती : मुख्याधिकार्यांना अवार्च भाषा, कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन

बारामती : मुख्याधिकार्यांना अवार्च भाषा, कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन

Published On: Jun 13 2018 6:57PM | Last Updated: Jun 13 2018 6:57PMबारामती : प्रतिनिधी

शहरातील पतंगशानगर येथील अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून पालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाने मुख्याधिकारी योगेश कडूसकर यांना अर्व्वाच्य भाषा वापरल्याचा प्रकार बुधवारी (दि. १३) मुख्याधिकाऱयांच्या दालनात घडला. नगरपरिषद अधिकारी-कर्मचाऱयांनी या घटनेचा निषेध करत पालिकेपुढे ठिय्या मांडत काम बंद आंदोलन केले.

शहरातील पतंगशानगर परिसरातील अतिक्रमणाचा मुद्दा गेल्या दोन दिवसांपासून पालिकेत गाजतो आहे. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाने थेट मुख्याधिकाऱ्यांनाच अर्वाच्च भाषा वापरली. विशेष म्हणजे यावेळी राष्ट्रवादीचे अन्य काही नगरसेवकही उपस्थित होते. या घटनेने कमालीच्या व्यथित झालेल्या कडूसकर यांनी कार्यालय सोडले. अधिकारी-कर्मचाऱयांना ही घटना कळताच त्यांनी पालिकेच्या इमारतीसमोर ठिय्या मांडत दुपारी दोनपासून काम बंद आंदोलन केले. सायंकाळी साडेपाच वाजता या घटनेवर पडदा पडला. यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे हे ही उपस्थित होते.

कडूसकर यांनी नगरसेवकाकडून घडलेला प्रकार समज-गैरसमजातून झाला होता असे सांगत अधिकारी-कर्मचाऱयांना कामावर रुजू होण्यास सांगितले. यासंबंधी आंदोलनकर्त्यांसमोर अधिक बोलणेही कडूसकर यांनी टाळले. पालिकेत घडलेला प्रकार वाढवू नका, समज-गैरसमज मिटले असून अधिकारी-कर्मचाऱयांनी पालिकेला साथ द्यावी असे आवाहन नगराध्यक्षा तावरे यांनी केले. एका घरातही भांड्याला भांडे लागते, ही तर पालिका आहे, एवढे तेवढे घडणारच असे म्हणत नगराध्यक्षांनीही झालेल्या प्रकारावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी संतप्त काही कर्मचाऱयांनी नेमकी काय घटना घडली होती, संबंधित नगरसेवकाने येवून माफी मागावी अशी मागणी केली. त्यावर काही घडलेच नसल्याचा अजब दावा उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे यांनी केला. यावरून काही काळ येथे तु तु मै मै झाली. तानाजी पाथरकर व जहीर पठाण यांनीही या प्रकाराचा जाब मुख्याधिकाऱयांना विचारला.

दरम्यान, दुपारी दालनात घडलेल्या प्रकारानंतर काही नाट्यमय घडामोडीही घडल्या. नगराध्यक्षांच्या निवासस्थानी बैठक घेवून हा प्रकार वाढू नये याची पुरेपुर काळजी राष्ट्रवादीकडून घेण्यात आली. एरव्ही विरोधकांच्या छोट्याशा बाबींवरून रणकंदन माजवणारी राष्ट्रवादी बुधवारी त्यांच्याच नगरसेवकाने केलेल्या अर्वाच्च भाषेमुळे अडचणीत आली. या विषयावर सारवासारव करण्याचे प्रयत्न दिवसभर सुरु होते. अनेक विभागांच्या प्रमुखांनी घडलेल्या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच काही अधिकारी-कर्मचाऱयांनाही मुख्याधिकाऱयांनी घेतलेला यू टर्न तोंडावर पाडणारा ठरला. नगरसेवक मुख्याधिकाऱयांना अर्वाच्च भाषा वापरत असतील तर आमच्यासारख्याचे काय असा सवाल या मंडळींनी केला.