होमपेज › Pune › द्वेषाच्या राजकारणामुळे महाराष्ट्राची अधोगती होईल : आव्हाड

द्वेषाच्या राजकारणाने राज्याची अधोगती होईल : आव्हाड

Published On: Apr 24 2018 12:45PM | Last Updated: Apr 24 2018 2:08PMपिंपरी : प्रतिनिधी

मनुस्मृतीचा हवाला देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक करण्यास नकार देणारे पुढे इतिहासाचे लेखक झाल्याने ब्राह्मणी दृष्टिकोनातून खोटा आणि विकृत इतिहास लिहिला गेला. मनुस्मृतीला आव्हान देणार्‍यांची वेळोवेळी हत्या करण्यात आली. हिंदू-मूस्लीम हा संघर्ष अनेक वेळा वापरून झाल्याने राजकारणासाठी सवर्ण विरूद्ध दलित ही नवी खेळी आता खेळली जात असून द्वेषाच्या राजकारणमुळे महाराष्ट्रची अधोगती होईल, असे मत आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्‍त केले. 

मोहननगर चिंचवड येथे जयभवानी तरुणमंडळ आणि कालीमाता मित्रमंडळ यांच्या वतीने आयोजित फुले-शाहू-आंबेडकर-लोकमान्य व्याख्यानमालेत ’छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचे राजकारण’ या विषयावर अंतिम पुष्प गुंफताना आव्हाड बोलत होते. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, नगरसेवक प्रमोद कुटे, वैशाली काळभोर, कॅप्टन नारायण दास, शंकर पांढारकर, भगवान पठारे, नारायण बहिरवाडे, मुख्य संयोजक मारुती भापकर उपस्थित होते.

पुढे बोलताना आव्हाड म्हणाले, ‘‘जेम्स लेनचे पुस्तक हा महाराष्ट्राच्या राजकारणातला टर्निंग पॉईन्ट होता. बहुजनांमध्ये वाचनसंस्कृती कमी असल्याने शालेय जीवनात जो विकृत इतिहास आम्हाला सांगितला गेला, तोच आम्ही ग्राह्य धरला. जेम्स लेन प्रकरणातून धक्का बसल्याने महाराष्ट्र खडबडून जागा झाला. वास्तविक जेम्सला माहिती देणारे हे आमच्यातलेच काही गद्दार होते. बाबासाहेब पुरंदरे यांचे कादंबरीलेखन हे शिवचरित्र आहे, असे सर्वत्र बिंबवण्यात आले. दुष्काळी परिस्थितीत विजापूरला पाच हजार पोती धान्य पाठवणारे, आपल्या आईला सती जाण्यापासून रोखणारे छत्रपती शिवाजी महाराज  हे प्रगल्भ आणि पुरोगामी असताना त्यांची प्रतिमा ’गोब्राह्मणप्रतिपालक’ आणि मुस्लीमविरोधी अशी कट्टर धार्मिक म्हणून रंगवण्यात आली. अफजलखान, शाहिस्तेखान हे फक्त मुस्लीम होते म्हणूनच शिवाजी महाराज त्यांच्या विरोधात लढले अशी मुस्लीम द्वेषभावना शालेय वयापासून मुलांच्या मनात रुजवण्यात आली. म्लेच्छांना मारणे ही आपली जबाबदारी आहे!’ असे संभाजी भिडे म्हणतात. ’ज्याप्रमाणे मुंगूस सापांना मारतो, त्याप्रमाणे आपण म्लेच्छांना मारले पाहिजे!’ असेही सांगतात.

Tags : pimpri chinchwad, NCP MLA Jitendra Ahwad