Tue, Apr 23, 2019 22:25होमपेज › Pune › भगवीकरण करुन चुकीचा इतिहास शिकवला जातोय : पवार

भगवीकरण करुन चुकीचा इतिहास शिकवला जातोय : पवार

Published On: Apr 11 2018 3:55PM | Last Updated: Apr 11 2018 3:55PMमावळ : पुढारी ऑनलाईन

संपूर्ण देशाचे भगवीकरण करणे सुरु आहे. उत्तर प्रदेशमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा रंग भगवा केला. दहावीच्या पुस्तकात राजकिय पक्षांचा उल्लेख करुन चुकीचा इतिहास शिकवला जात असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. ते पुणे जिल्ह्यातील मावळ येेथे हल्लाबोल यात्रेत बोलत होते. 

सरकारने भाजपचा इतिहास पुस्ताकांमधून रंगवून सांगितला. भाजप-सेनेचे उदात्तीकरण त्यात केले गेले आहे. मुलांना चुकीचा इतिहास शिकवणे योग्य नसल्याचे अजित पवार म्हणाले. सत्तेमधील सर्वच लोक फसवणूक करणारे आहेत. या सरकारने सर्व आश्वासनांबाबत मोठा यु टर्न घेतला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी १० लाखांचा कोट घालतात. ते म्हणतात मी चौकीदार आहे. मग चौकीदार एवढे महाग कपडे कसे घालतात? असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या नावाने चिठ्ठी लिहून शेतकरी आत्महत्या

शेतकरी आत्महत्यांवरुन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, नांदेडच्या एका शेतकऱ्याने स्वतःचे सरण रचले. यवतमाळमध्ये एका शेतकऱ्याने पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नावे चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. राज्यात ही शोकांतिका आहे. आता तर खालच्या पातळीवरचे राजकारणही सुरु केले. राष्ट्रवादीची सभा विस्कळीत व्हावी म्हणून कामशेत ग्रामपंचायतने ड्रेनेजची लाईन खुली केली आहे. जेणेकरून सभेच्या ठिकाणी वास येईल व लोक सभेला येणार नाही. पण थोडे दिवस कळ काढा, देशभरातून भाजपचा वास काढून टाकू असा इशाराच मुंडे यांनी दिला.

शिक्षणात राजकारण पहिल्यांदाच

खासदार सुप्रिया सुळे यांनी दहावीच्या पुस्तकातील राजकिय पक्षांच्या उल्लेखावरुन सरकारवर हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या की, दहावीच्या पुस्तकात राजकीय पक्षांचा उल्लेख हे महाराष्ट्रात प्रथमच घडतेय. शिक्षणात राजकारण कधीच आले नव्हते. मुलांना चुकीचे शिकवू नका. जर येत्या आठ दिवसात ही पुस्तके बदलली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला.

Tags : NCP, national Congress Party, Ajit Pawar, Dhananjay Munde, Supriya Sule, Hallabol, Pune, PM, Narendra Modi, CM, Devendra Fadanvis