होमपेज › Pune › विधानपरिषदेचे माजी सभापती ना.स. फरांदे यांचे निधन

विधानपरिषदेचे माजी सभापती ना.स. फरांदे यांचे निधन

Published On: Jan 16 2018 10:27AM | Last Updated: Jan 16 2018 12:46PM

बुकमार्क करा
पुणे : पुढारी ऑनलाईन

विधानपरिषदेचे माजी सभापती नारायण सीताराम फरांदे यांचे पुण्यात निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. घरातील बाथरुममध्ये पाय घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला. मेंदूतून रक्‍तस्रवा सुरू झाल्याने त्यांना पुण्यातील एमजेएम रुग्‍णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान आज त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्‍नी, मुलगा, तीन मुली असा परिवार आहे.

एन. एस. फरांदे म्‍हणून ओळखले जाणारे नारायण फरांदे हे मूळचे सातारा जिल्‍ह्यातील ओझरडे येथील होते. त्यांचे उच्‍च शिक्षण सोलापुरात झाले. त्यानंतर त्यांनी प्राध्यापक म्‍हणून धुळे व नगर जिल्‍ह्यात कोपरगाव येथे नोकरी केली. कोपरगावला प्राध्यापक असतानाच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. नगर जिल्‍हा भाजपचे अध्यक्ष तसेच भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाचीही सूत्रे त्यांनी सांभाळली होती.

गोपीनाथ मुंडेंच्या 'माधव' फॉर्म्युल्यातून राजकारणात

फरांदे हे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या माळी, धनगर, वंजारी (माधव) या फॉर्म्यूल्यातून राजकीय क्षितीजावर आले. त्यांचे खंदे समर्थक अशी फरांदे यांची ओळख होती. 

नाशिक पदवीधर मतदारसंघातून ते दोन वेळा विधानपरिषदेवर निवडून गेले. विधान परिषदेचे उपसभापती व सभापती ही दोन्ही पदे त्यांनी भूषविली. त्यांनी नगरमधून लोकसभा निवडणूकही लढवली होती. पण त्यांंचा पराभव झाला.