होमपेज › Pune › सकाळी इंधन भरल्यास मायलेज जास्त, हा गैरसमज

सकाळी इंधन भरल्यास मायलेज जास्त, हा गैरसमज

Published On: Jan 12 2018 11:14AM | Last Updated: Jan 12 2018 11:14AM

बुकमार्क करा
पुणे: पुढारी वृत्तसेवा

सकाळच्या वेळात गाडीत इंधन भरले, तर मायलेज जास्त मिळेल; जेट फ्युएल भरले तर कार जास्त वेगाने दौडेल, अशा काही अफवा मोटार चालकांमध्ये पसरलेल्या असतात. तथापि, हे गैरसमज असून वाहनचालकांनी शास्त्रोक्त माहिती समजून घ्यावी, असे आवाहन वाहन उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी केले आहे.

कारमध्ये इंधन भरण्याबाबतचे काही साधारणपणे आढळणारे गैरसमज फोर्ड कंपनीचे वरिष्ठ अभियंते कोलिन हार्डिंग यांनी दूर केले आहेत. त्यांनी इंधनक्षमता वाढवणारे काही उपायही मोटारचालकांसाठी उद्धृत केले आहेत. सकाळी हवा थंड असते, त्यामुळे टाकीमध्ये जास्त पेट्रोल भरू शकते, म्हणून सकाळी इंधन भरल्याने जास्त मायलेज मिळते, हा एक मोठा गैरसमज आहे. उष्णतेने पेट्रोल प्रसरण पावते हे खरे असले, तरी इंधनाच्या टाक्या गाडीच्या खालच्या भागात असतात आणि या भागात दिवसाचं तापमान हा मुद्दाच नसतो. त्यामुळे पेट्रोलच्या घनतेवरही काही परिणाम होत नाही. तेव्हा चालकांनी हव्या त्या वेळी इंधन भरणे योग्य ठरते, असे हार्डिंग यांनी म्हटले आहे. कमी इंधनावर गाडी चालवणे इंजिनसाठी वाईट, हा दुसरा गैरसमज आढळतो. कमी इंधनावर गाडी चालवत राहिल्यास कारचे इंजिन टाकीच्या तळाचे खराब पेट्रोल ओढते असे मानले जाते. मात्र, खरे तर इंधनाच्या टाक्यांची रचनाच अशी केलेली असते की, सर्वप्रथम टाकीच्या तळाशी असलेलं इंधन ओढले जाते. याचा अर्थ इंजिन कायमच तळाचे इंधन वापरत असते. टँक पूर्ण भरलेला असताना ज्या दर्जाचं इंधन इंजिन वापरते, त्याच दर्जाचे इंधन टँक रिकामा होत आलेला असतानाही वापरले जाते, असे हार्डिंग यांनी स्पष्ट केले आहे.

रेंज रीडिंग्ज चुकीची ठरतात, असेही काही चालकांचे म्हणणे असते. टाकीत नेमके किती इंधन उरलं आहे हे चालकाला इंधनाच्या परिमाणांमध्ये सांगितले जात असले, तरी रेंज रीडिंग्ज दीर्घकाळाच्या ड्रायव्हिंग नमुन्यांच्या आधारे मोजली जातात, असे हार्डिंग यांनी सांगितले. याचबरोबरीने, इंधन वाचवू शकतील, अशा काही टिप्स हार्डिंग यांनी दिल्या आहेत.

इंजिन कायम दुरुस्त ठेवणे आवश्यक आहे, असे ते म्हणतात. कार्बन उत्सर्जनाच्या चाचणीत नापास झालेले वाहन दुरुस्त केले की ते चालवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या इंधनाचे प्रमाण सरासरी चार टक्क्यांनी कमी होते. अर्थात नीट काम न करणारा ऑक्सिजन सेन्सर बदलून मायलेज तब्बल 40 टक्क्यांपर्यंत वाढू शकते, असे हार्डिंग यांनी म्हटले आहे.

टायर्समध्ये कायम पुरेशी हवा भरलेली असू देणे योग्य आहे. योग्य प्रमाणात हवा भरलेली टायर्स अधिक सुरक्षित, गाडी चालवण्यासाठी सुलभ, अधिक टिकाऊ तर असतातच; शिवाय त्यामुळे इंधनाची कार्यक्षमताही वाढते. अर्थात जास्त हवा भरलेले टायर्स फारसे टिकाऊ ठरत नाहीत व घर्षणही जास्त करतात, असा इशारा हार्डिंग यांनी दिला आहे. प्रमाणित दर्जाचे मोटर ऑईल वापरण्याची सूचना हार्डिंग यांनी केली आहे. त्यामुळे इंजिनाची वंगण क्षमता कमाल मर्यादेत काम करते. चुकीच्या दर्जाचे मोटार ऑईल वापरल्याने इंधन वापरात दोन टक्क्यांनी वाढ होते, असे ते म्हणतात.

प्रीमियम इंधन भरल्यास साध्या गाडीचा वेग वाढतो, हेही चूक आहे, असे हार्डिंग म्हणतात. ही प्रीमियम इंधने महाग असतात व तरीही नियमित इंधनाइतकी स्वच्छ, शुद्ध नक्कीच नसतात. ती कमी ज्वलनशील असतात. शक्तिशाली इंजिनांसाठी हे फायद्याचे असते, तथापि दैनंदिन वापरात त्याचा फायदा होत नाही. कारण, सर्व प्रकारच्या इंधनांना ठराविक मानके पूर्ण करावीच लागतात, अशी माहिती हार्डिंग यांनी दिली आहे.