Tue, May 21, 2019 22:10होमपेज › Pune › माझे नाव कुलकर्णी नाही, संभाजी भिडे

माझे नाव कुलकर्णी नाही, संभाजी भिडे

Published On: Apr 26 2018 2:03AM | Last Updated: Apr 26 2018 1:48AMपुणे : प्रतिनिधी

कोरेगाव-भीमा येथे दोन गटांत जातीय दंगल झाल्याप्रकरणी सांगली येथील शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्याविरोधात शिक्रापूर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर न्यायालयात आरोप-प्रत्यारोप झाले होते. याप्रकरणी म्हणणे दाखल करताना, माझे नाव मनोहर विनायक कुलकर्णी नसून संभाजी भिडेच असल्याचे म्हणणे त्यांच्या वकिलांनी आज कोर्टात सादर केले. दरम्यान, त्यांच्या वकिलांना याप्रकरणी म्हणणे मांडण्यासाठी सर्व कागदपत्रे पुरविण्याचे आदेश विशेष न्या. प्रल्हाद भगुरे यांनी दिले आहेत. 

सदर घटनेत संजय भालेराव यांची इनोव्हा कार जळाल्याने त्यांनीही कोर्टात धाव घेत, भिडे यांची ब्रेनमॅपिंग, पॉलिग्राफ चाचणी करण्यात यावी, अशी मागणी वकिलांमार्फत केली होती. याप्रकरणी भिडे यांची बाजू मांडण्यात यावी, अशी सूचना कोर्टाने केली होती. यासंदर्भात त्यांना म्हणणे मांडण्यासाठी सांगण्यात आले होते. त्यानंतर त्यांना मनोहर विनायक कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडे या नावाने नोटीसही न्यायालयाच्या वतीने काढण्यात आली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर बुधवारी प्रथमच संभाजी भिडे यांच्या वतीने  अ‍ॅड. पुष्कर दुर्गे न्यायालयात हजर झाले. त्यांनी पहिल्याच मुद्द्याचे खंडन करताना, माझे  नाव मनोहर विनायक कुलकर्णी नसून संभाजी भिडेच असल्याचे न्यायालयात सांगितले.  

अ‍ॅड. दुर्गे यांनी तक्रारदार संजय भालेराव यांनी भिडे यांच्याविरोधात तक्रार दाखल करताना मनोहर विनायक कुलकर्णी (वय 59) असे सांगितले आहे. मात्र, हे नाव चुकीचे असून संभाजी भिडे (वय 81) असे असून ते दुरुस्त करण्यात यावे, असे सुचविले आहे. तसेच तक्रारदार यांनी तक्रारीत नमूद केल्यानुसार माझ्या विरोधातील व्हिडिओ फुटेज, व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंग, कोरेगाव-भीमासंदर्भातील पत्रके, फोटो, तक्रार यांची प्रत देण्यात यावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली. त्यानुसार न्यायालयाने सदर मागणी मान्य करत तक्रारदार यांनी त्यांच्याकडील माहिती भिडे यांच्या वकिलांना द्यावी, असा आदेश दिला आहे. याप्रकरणी अनिता सावळे या सामाजिक कार्यकर्तीने तक्रार दिलेली आहे. त्यानुसार प्रथमच भिडे यांच्या वतीने सुमारे चार महिन्यांनंतर अ‍ॅड. पुष्कर दुर्गे यांनी म्हणणे सादर केले.