होमपेज › Pune › चिमुकलीच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट 

चिमुकलीच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट 

Published On: May 29 2018 1:34AM | Last Updated: May 29 2018 1:12AMपुणे : प्रतिनिधी

खोदकाम करणार्‍या जेसीबीच्या पाठीमागील चाकाखाली येऊन कामगाराच्या दीड वर्षाच्या चिमुकीलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती न देता चालक, मालकांनी चिमुकलीचा मृतदेह तिच्या आई-वडिलांना देऊन तो पुरून टाकण्यास सांगितल्याचे पोलिसांकडे आलेल्या निनावी अर्जामुळे उघडकीस आले आहे.  हडपसर भागातील फुरसुंगी येथे हा प्रकार अडीच महिन्यांपूर्वी घडला आहे. 

दीपाली धर्माजी गायकवाड (वय दीड वर्ष) असे यात मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. याप्रकरणी जगन्नाथ बापुराव वाघमारे (30, रा. फुरसुंगी), सागर जालिंदर दिघे (वय 28, रा. फुरसुंगी) आणि बालाजी विठ्ठलराव शिंदे (वय 42) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यासंदर्भात पोलिस निरीक्षक (गुन्हे) अजुंम बागवान यांनी फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जगन्नाथ हा जेसीबीचा चालक आहे. तर, सागर हा मालक असून, बालाजी हा ठेकेदार आहे. दरम्यान फुरसुंगी येथील हरपळे वस्तीत ग्रीन हाईव सोसायटीचे कामकाज सुरू आहे.  6 मार्च रोजी चालक जेसीबी घेऊन खोदकाम करत होता. त्यावेळी पाठीमागील चाकाखाली आल्याने  कामगाराची दीड वर्षाची मुलगी दीपाली हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. परंतु, आरोपींनी  पोलिसांना घटनेची माहिती दिली नाही. घटनेची माहिती मिळताच जेसीबी मालक सागर तेथे आला. हे प्रकरण दाबण्यासाठी त्याने आई संगिता आणि वडिल धर्माजी यांना बाजूला नेले.

त्यानंतर त्यांच्यात काहीतरी बोलणे झाले. आरोपींनी दीपालीच्या आई-वडिलांना पोलिसांना घटनेची माहिती  देऊ नका, असे म्हणत त्यांच्या ताब्यात दीपालीचा मृतदेह दिला. तसेच, तो पुरून टाकण्यास सांगितले. त्यानंतर आई-वडिलांनाही मुलीचा मृतदेह  पोलिसांना न कळवता  पुरून टाकला. त्यानंतर ते गावी निघून गेले. याघटनेनंतर परिमंडळ चारच्या कार्यालयात दि. 16 मार्च रोजी एक निनावी अर्ज आला. त्यात याघटनेची माहिती देण्यात आली होती. परिमंडळ चारचे उपायुक्त दीपक साकोरे यांनी या अर्जाची हडपसर पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार, हडपसर पोलिसांनी चौकशी सुरू केली. पोलिसांनी प्रथम घटनास्थळी धाव घेतली. तसेच ग्रीन हाईव सोसायटीच्या सुपरवायझर जामू जोगदंड यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी त्याने घटना खरी असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांना शोधून त्यांच्याकडे विचारपूस केली. त्यावेळी हा प्रकार समोर आला.