होमपेज › Pune › मुस्लिम मूक महामोर्चाचे विद्यार्थिनी करणार नेतृत्व

मुस्लिम मूक महामोर्चाचे विद्यार्थिनी करणार नेतृत्व

Published On: Sep 09 2018 2:13AM | Last Updated: Sep 09 2018 1:36AMपुणे : प्रतिनिधी

आघाडी सरकारने मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण दिले होते. त्यास न्यायालयाने कायम ठेवले होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने त्याची अंमलबजावणी केलेली नाही. आरक्षण कायम करावे या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी मुस्लिम समाजाचा मूक मोर्चा रविवारी (दि.9) सकाळी 10 वाजता काढण्यात येणार आहे. मोर्चाचे नेतृत्व विद्यार्थिनी करणार आहेत.  

मोर्चाला पुणे शहर आणि जिल्ह्यातील विविध पक्ष संघटनांनी पाठिंबा दिला आहे. मोर्चामध्ये लाखांच्या वर मुस्लिम समाजबांधव सहभागी होणार असल्याचे मुस्लिम मूक महामोर्चा समन्वय समितीच्या वतीने सांगण्यात आले. आरक्षणाची अंमलबजावणी राज्य सरकारकडून केली जात नाही. तसेच गोरक्षा, लव्हजिहाद व अन्य कोणत्याही कारणाने निष्पाप मुस्लिम व्यक्तींची हत्या केली जात आहे. दलित व मुस्लिमांवरील जातीय, धार्मिक अत्याचाराच्या घटना रोखण्यात याव्यात, मुस्लिम समाजाला अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण देण्यात यावे, आदी मागण्यांसाठी पुणे, पिंपरी-चिंचवड व पुणे जिल्हा मुस्लिम समाज बांधवाच्या वतीने मुस्लिम मूक महामोर्चा काढला जाणार आहे.

विधानभवन येथे सभेने समारोप 

मोर्चाला शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी, रिपाइं, बसपा, जनता दल, दलित पँथरचे सुखदेव सोनवणे यांच्यासह शंभरपेक्षा अधिक पक्ष संघटनांनी मोर्चाला पाठिंबा दिला आहे. मोर्चाच्या नियोजनासाठी सुमारे दोन हजार स्वयंसेवक राहणार आहेत. मोर्चामध्ये कोणत्याच घोषणा दिल्या जाणार नाहीत. मोर्चाच्या नेतृत्वात सर्वांत पुढे मुलींचा जथ्था राहणार असून, त्यानंतर महिला, ज्येष्ठ नागरिक, तरुणानंतर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि नेते असणार आहेत.