Thu, Apr 25, 2019 23:28होमपेज › Pune › पुण्यात मुस्लिम समाजाचा अभूतपूर्व मूकमोर्चा

पुण्यात मुस्लिम समाजाचा अभूतपूर्व मूकमोर्चा

Published On: Sep 10 2018 1:17AM | Last Updated: Sep 10 2018 12:55AMपुणे : प्रतिनिधी

संविधानात नमूद केलेल्या नियमानुसार कुठलाही भेदभाव न करता सर्वांसाठी समान न्याय समाजातील सर्व घटकांना मिळावा, याबरोबरच आघाडी सरकारने दिलेले 5 टक्‍के आरक्षण कायम करावे यांसह विविध मागण्यांसाठी मुस्लिम मूक महामोर्चा समन्वय समितीच्या वतीने रविवारी काढलेल्या अभूतपूर्व अशा मोर्चात मुस्लिम बांधवांसह इतर समाजबांधव हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चात सकल मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्तेही फेटे बांधून सहभागी झाले होते.

विधानभवनासमोर आयोजित सभेत मुस्लिम तरुणींनी भाषणातून समाजाची व्यथा आणि होत असलेला अन्याय मांडला. सकाळी गोळीबार मैदान येथून मोर्चाची सुरुवात झाली. सहभागी मोर्चेकर्‍यांच्या हाती विविध मागण्यांचे फलक होते. 

मोर्चासाठी तीन हजार स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यांनी व्यवस्थितरीत्या मोर्चार्तील सहभागी व्यक्तींना मदत केली. या मोर्चामध्ये कुठल्याच घोषणा दिल्या नाहीत. मोर्चाच्या नेतृत्वात सर्वांत पुढे मुली, त्यानंतर महिला, ज्येष्ठ नागरिक, तरुण तर सर्वांत शेवटी राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

मुस्लिम समाजाला नोकरी आणि शिक्षणात 5 टक्‍के आरक्षण द्यावे, मुस्लिम समाजाला अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण द्यावे, वक्फ बोर्डाच्या जमिनींवरील अतिक्रमणे त्वरित हटवावीत, मुस्लिमांसह दलित आणि इतर जातींवर होणारे अत्याचार थांबवावेत आणि मुस्लिमांचे सामूहिक हत्याकांड करणार्‍यांना फाशीची शिक्षा द्यावी, यांसह  मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण द्यावे, अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या.

गोळीबार मैदानापासून सुरू झालेला मूकमोर्चा सेव्हन लव्हज चौकातून उजवीकडे वळून सोनवणे हॉस्पिटल, रामोशी गेट, केईएम रुग्णालय, नरपतगिरी चौकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते साधू वासवानी चौक ते विधानभवनासमोर पोहोचला.  तरुणींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना मागण्यांचे निवेदन दिले. दुपारी दीडच्या सुमारास समारोप सभेला सुरुवात झाली. त्यामध्ये तरुणींनी आपले विचार व्यक्‍त केले. दुपारी अडीच वाजता राष्ट्रगीताने मोर्चाचा समारोप झाला. 

विविध पक्ष, संघटनांचा सहभाग

मुस्लिम मूक महामोर्चामध्ये शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, बसपा, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांसह विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोर्चाला पाठिंबा देऊन कार्यकर्ते सहभागी झाले होते. तसेच मोर्चाला मराठा क्रांती मोर्चा आणि मराठवाडा बहुप्रतिष्ठानच्या वतीने जाहीर पाठिंबा देऊन सहभाग घेतला. खासदार संजय काकडे आरक्षणाच्या समर्थनार्थ टी-शर्ट घालून सहभागी झाले होते. मातंग एकता आंदोलन, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, भीम छावा, मातंग संघर्ष महामोर्चा, लहुजी समता परिषद, राष्ट्रीय जनसेवा प्रतिष्ठान, जनता दल (सेक्युलर), क्रांतिवीर लहुजी शक्‍ती सेना, पुणे व्हिजन, रिपब्लिकन युवा मोर्चा आदी संघटना सहभागी झाल्या होत्या.

मुस्लिम समाजाच्या मागण्या

मुस्लिम समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, मॉबलिचिंगच्या घटना थांबल्या पाहिजेत, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डातील हस्तक्षेप थांबला पाहिजे, वक्फ बोर्ड जमिनीवरील अतिक्रमण हटवा, मुस्लिमांना अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत सुरक्षा द्या, तसेच मराठा व धनगर समाजाला आरक्षण मिळावे.