Wed, Sep 19, 2018 21:09होमपेज › Pune › मराठा मोर्चावर मुस्लिम बांधवांची पुष्पवृष्टी

मराठा मोर्चावर मुस्लिम बांधवांची पुष्पवृष्टी

Published On: Aug 10 2018 12:59AM | Last Updated: Aug 10 2018 12:59AMमंचर : प्रतिनिधी

सकल मराठा समाजाने गुरूवारी (दि. 9) काढलेल्या मोर्चाला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोर्चाच्या अग्रभागी छत्रपती शिवाजीमहाराजांचे, माँ जिजाऊ साहेब व मावळ्यांच्या वेशभूषेत बालचमू सहभागी झाले होते. मंचर बाजारपेठेत मोर्चा येताच मुस्लिम बांधवांनी मोर्चावर पुष्पवृष्टी करून मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शविला.

या मोर्चामध्ये शिवाजी चौकात विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसेपाटील यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. मंचर येथील बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळून मोर्चाला सुरूवात झाली. या वेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसेपाटील, राजमाता जिजाऊ प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. सुनिल बांगर आदी सहभागी झाले होते.

हा मोर्चा लक्ष्मी रस्ता, शिवाजी चौक , घोडेगाव रस्ता मार्गे बाजार पेठ येथे आला असता मुस्लिम समाजाचे नेते, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजू इनामदार आणि त्यांच्या सहकार्‍यांनी मोर्चेकर्‍यांच्या डोक्यावर झेंडुच्या पाकळ्यांची उधळण केली. त्यानंतर मोर्चा संभाजी चौकातून शिवाजी चौकात आला.  विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसेपाटील, उपविभागीय अधिकारी अजित देशमुख, पोलिस निरीक्षक प्रदीप जाधव यांना मोर्चकर्‍यांच्या वतीने निवेदन देवून राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता झाली.