प्रतिनिधी : पुणे
ज्येष्ठ संगीततज्ज्ञ आणि वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करणारे संगीतकार पं. मधुसूदन नारायण ऊर्फ म. ना. कुलकर्णी (वय ८८) यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी रात्री निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुलगे, सुना, नातवंडे आणि पतवंडे असा परिवार आहे. म. ना. कुलकर्णी यांच्या पार्थिवावर बुधवारी (१६ मे) सकाळी आठ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
म. ना. कुलकर्णी यांनी ‘मना’तल्या भावकळ्या’ या भावगीतांच्या कार्यक्रमाची निर्मिती केली होती. ‘मुलाफुलांची गाणी’ आणि ‘सायसाखरेची गाणी’ या बालगीतांच्या लोकप्रिय कार्यक्रमांसह ‘सूर शब्द लहरी’ या शास्त्रीय संगीतावर आधारित कार्यक्रमाची निर्मिती केली होती.
स्वामी विवेकानंद यांचे गीतरूपी चरित्र असलेल्या ‘तेजाची आरती’, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर यांचे चरित्र असलेले ‘गीत गाते इंद्रायणी’ आणि भक्तिगीतांवर आधारित ‘नाम घेता भगवंताचे’ हे त्यांनी स्वरबद्ध केलेले कार्यक्रम गाजले होते. संगीत क्षेत्रातील प्रदीर्घ वाटचाल त्यांनी ‘मना’तल्या भावकळ्या’ या आत्मचरित्रात शब्दबद्ध केली होती.
त्यांनी आकाशवाणी पुणे केंद्रासाठी अनेक भावगीते स्वरबद्ध केली होती. त्यांच्या शिष्यांमध्ये प्रसिद्ध भजनगायक रघुनाथ खंडाळकर, सुरंजन खंडाळकर, शुभम खंडाळकर, रश्मी मोघे आणि अभिलाषा चेल्लम या लोकप्रिय कलाकारांचा समावेश आहे.