पुण्याच्या महापौरपदी मुरलीधर मोहोळ निश्‍चित

Last Updated: Nov 19 2019 1:40AM
Responsive image


पुणे : पुणे महापालिकेच्या महापौरपदासाठी भाजपकडून मुरलीधर मोहोळ आणि उपमहापौरपदासाठी सरस्वती शेंडगे यांनी अर्ज सादर केलेत, तर काँग्रेस आघाडीकडून महापौरपदासाठी राष्ट्रवादीचे प्रकाश कदम आणि उपमहापौरपदासाठी काँग्रेसच्या चांदबी नदाफ यांनी अर्ज भरला आहे. सत्ताधारी भाजपचे पालिकेत बहुमत असल्याने मोहोळ आणि शेंडगे यांच्या निवडीची केवळ औपचारिकता उरलेली आहे.महापौर आणि उपमहापौरपदासाठी येत्या 22 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. त्यासाठी सोमवारी अर्ज दाखल करण्यात आले. 

महापौरपद हे खुल्या सर्वसाधारण वर्गासाठी आहे. त्यामुळे भाजपकडून इच्छुकांची संख्या मोठी होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत कोथरूड मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने येथील इच्छुक उमेदवार स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांना पक्षाने महापौरपदाची संधी दिली. तर उपमहापौरपदासाठी महिला नगरसेवकांमध्येही रस्सीखेच असताना, भाजपने अनपेक्षितरीत्या नगरसेविका सरस्वती शेंडगे यांना उमेदवारी जाहीर केली. भाजप शहराध्यक्ष व आमदार माधुरी मिसाळ यांनी या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. या वेळी खासदार संजय काकडे, स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, सरचिटणीस गणेश बीडकर, सुनील पांडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

पालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने एकत्र येत या दोन्ही पदांसाठी उमेदवारी अर्ज सादर केले. त्यात महापौरपदासाठी राष्ट्रवादीचे कदम तर उपमहापौरपदासाठी काँग्रेसच्या चाँदबी नदाफ यांनी अर्ज सादर केला.

महापालिकेत शिवसेनेबरोबर आघाडी नाहीच
राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडी यांच्या एकत्रित हालचाली सुरू आहेत. त्यामुळे महापालिकेत महापौर व उपमहापौरपदासाठीच्या निवडणुकीत ही आघाडी एकत्र येणार का, याबाबत उत्सुकता होती. मात्र, शिवसेना या निवडणुकीपासून दूरच राहिली. या दोन्ही पदांसाठी सेनेकडून अर्ज दाखल करण्यात आलेले नाहीत.

स्थायी समिती अध्यक्षपदापाठोपाठ महापौर
पालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर पहिल्याच वर्षात मोहोळ यांना स्थायी समिती अध्यक्षपद मिळाले. त्यानंतर अवघ्या दीड वर्षात त्यांना महापौरपदाची संधी मिळाली. एकाच टर्ममध्ये या दोन्ही पदांवर काम करणारे मोहोळ हे पहिले नगरसेवक ठरलेत.

महापौर-उपमहापौरपद एकाच वर्षासाठी
महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर महापौर व उपमहापौरपद अडीच वर्षांसाठी कायम ठेवण्यात आलेले होते. आता मात्र ही दोन्ही पदे एकाच वर्षांसाठी असणार आहेत. त्यामुळे मोहोळ आणि शेंडगे यांना एकच वर्षाचा कालावधी मिळणार आहे.