Wed, May 22, 2019 14:48होमपेज › Pune › स्वच्छ स्पर्धेसाठी पालिकेची कसरत

स्वच्छ स्पर्धेसाठी पालिकेची कसरत

Published On: Dec 28 2017 1:28AM | Last Updated: Dec 28 2017 12:56AM

बुकमार्क करा
पिंपरी : मिलिंद कांबळे 

केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ शहर’ स्पर्धेत देशभरातील छोटे-मोठे तब्बल 4 हजार 41 शहरांचा सहभाग असल्याने 23 लाखांच्या पुढे लोकसंख्या असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराला स्पर्धेत टिकाव धरण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. स्पर्धेच्या तोंडावर विविध उपाययोजना करून अव्वल स्थान पटकाविण्यासाठी महापालिकेसह भाजपाचा  कारभार्‍यांनी कंबर कसली आहे. मात्र, प्रत्यक्ष सद्यस्थिती पाहता ही कसरत शहराला प्रथम 100 क्रमांकामध्येही आणण्यात कितीपत यशस्वी ठरेल, हे सांगणे अवघड आहे.

पिंपरी-चिंचवड शहर झपाट्याने वाढत आहे. त्यात दिवसेदिवस नागरिकांची संख्या वाढून नागरीवस्तीमध्ये भर पडत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनावर दैनंदिन घनकचरा विल्हेवाट लावण्याची मोठे आव्हान आहे. साधारण 750 ते 800 मेट्रिक टन कचरा जमा होता. सणासुदीच्या काळात त्यात आणखी भर पडते. हा कचरा मोशी कचरा डेपोत डंपीग करून त्यावर वेगवेगळी प्रक्रिया केली जाते. पालिकेने विविध उपाययोजना केल्या तरी कचरा वाढतच आहे.‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प अद्याप कागदावर आहे.  ‘हॉटेल वेस्ट’ जमा करून बायो गॅस निर्मितीचा प्रकल्प सुरू झालेला नाही. 

पालिकेने जून 2017ला शहरातील मोठ्या हाउसिंग सोसायट्यांमध्ये ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित केला जात आहे. मोठ्या सोसायट्यांना ओला कचरा सोसायटीत जिरविण्यास सांगितले जात आहे. उपक्रमास केवळ 30 टक्केपेक्षा कमी प्रतिसाद मिळाला आहे. आदर्श पर्यावरणपूरक हाउसिंग सोसायटी स्पर्धेत कचरा सोसायटीतच जिरविण्याची अट आहे. त्या प्रोत्साहनास किती सोसायट्या प्रतिसाद देतात हे पाहावे लागले. शहर हागणदारीमुक्त घोषित केल्यास शहराची पातळी वाढून 110 गुण मिळतात. मात्र, झोपडपट्टया,  एमआयडीसी, नदी काठ, नाले आदी परिसरात उघड्यावर शौचास बसण्याचे प्रमाण आहे. त्यामुळे शहर हागणदारीमुक्त न झाल्यास स्पर्धेत टिकू शकत नाही. स्वच्छता मोहिमेत नागरिकांचा सहभाग वाढावा म्हणून ‘स्वच्छता अ‍ॅप’ डाऊनलोडचे आवाहन पालिका करीत आहे. मात्र, पालिकेचे अ‍ॅप, संकेतस्थळ, सारथी हेल्पलाईन आणि व्हॅट्स अ‍ॅपवर प्रशासनाचा  समाधानकारक प्रतिसाद  नाही. 

महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना सदर अ‍ॅप सक्ती केले आहे. शहरातील सर्व शॉपिंग मॉल, महाविद्यालय, आरटीओ, नवनगर विकास प्राधिकरण व खासगी कंपन्यांना पत्र पाठविले असून अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले आहे. एकूण 35 हजार जणांना अ‍ॅप डाऊनलोड करण्याची अट असून, आतापर्यंत 17 हजार 193 जणांनी अ‍ॅप डाऊनलोड केले आहे.

आरोग्यासाठी नाही स्वतंत्र अधिकारी

महापालिकेने अद्याप आरोग्य विभागाकडे स्वतंत्र अधिकारी नेमलेला नाही. सहायक आयुक्तांच्या खांद्यावर आरोग्य विभागाचा अतिरिक्त भार दिला जातो. ही परंपरा पालिकेत कायम आहे.  सक्षम अधिकारी नसल्याने आरोग्यावर कोणाचे नियंत्रण नसल्याने शहरात अस्वच्छतेचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. दैनंदिन सफाई कामाचे ठेकेदारी पद्धतच बदलण्याचे उपाय प्रशासनाने स्वीकारला आहे. 

चार हजार गुणांसाठी खटपट

केंद्राची त्रैयस्त समिती शहरात येऊन स्वच्छतेची पाहणी करणार आहे. त्यासाठी पालिकेचा सेवास्तर प्रगतीस 35 टक्के, प्रत्यक्ष पाहणीस 30 टक्के आणि नागरिकांच्या प्रतिक्रियेला 35 टक्के गुण दिले जाणार आहेत. एकूण 4 हजार गुण आहेत. तसेच स्वच्छता सेवा, सार्वजनिक शौचालय, कचराकुंड्या, उघड्यावर शौच, नावीन्यपूर्ण योजना  असे विविध प्रकार पाहून गुण दिले जाणार आहेत.