पिंपरी : प्रतिनिधी
सामाजिक बांधिलकी म्हणून एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या वतीने विद्यार्थिनींकरिता सॅनिटरी नॅपकीन सहज उपलब्ध व्हावेत यासाठी पालिकेच्या 9 माध्यमिक शाळांमध्ये व्हेंडिंग मशिन व वापरलेल्या नॅपकीनची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी इन्सिनरेशन मशिन बसविण्यात आले. यापूर्वी आकुर्डी, काळभोरनगर, रुपीनगर, श्रमिकनगर निगडी येथील माध्यमिक शाळांमध्ये हे मशिन बसविण्यात आले आहे. पिंपळे गुरव, थेरगाव, क्रीडा प्रबोधिनी, केशवनगर व पिंपळे सौदागर येथे या वर्षात कंपनीच्या वतीने सीएसआरअंतर्गत सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग व इन्सिनरेशन मशिन बसविण्यात आले आहे.
एक्साईड इंडस्ट्रीज लि. यांनी पिंपळे गुरव माध्यमिक विद्यालयामध्ये बसविण्यात आलेल्या सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग व इन्सिनरेशन मशिनचे महानगरपालिकेस प्रातिनिधिक स्वरूपात हस्तांतरण केले. व्हेंडिंग मशिनमध्ये 5 रुपयांचे नाणे टाकल्यानंतर एक सॅनिटरी नॅपकीन मिळतो; तसेच वापर केलेला सॅनिटरी नॅपकीन इन्सिनरेशन मशिनमध्ये टाकल्यानंतर साधारण 15 मिनिटांमध्ये शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट होऊन त्याची राख अॅश ट्रेमध्ये राहते; तसेच मशिनला धूर जाण्यासाठी आऊटलेट काढण्यात आले आहे.
या कार्यक्रमास उपमहापौर शैलजाताई मोरे, महिला व बालकल्याण समिती सभापती सुनीता तापकीर, नगरसदस्या उषा मुंढे, चंदा लोखंडे, नगरसदस्य सागर आंघोळकर; तसेच एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे मुख्य अधिकारी के. अनिरुद्ध, श्रीमती एस. श्रीधरन, डेप्युटी मॅनेजर कुमारी निमा गिध; तसेच सह आयुक्त दिलीप गावडे, क्षेत्रीय अधिकारी स्मिता झगडे आदी उपस्थित होते.
सदरच्या मशिनसाठी अंदाजे 3 लाख 21 हजार रुपये खर्च सीएसआर तत्त्वावर प्रायोजक कंपनीमार्फत करण्यात आला आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात येणार्या विविध उपक्रमांसाठी सीएसआरअंतर्गत उद्योजक, व्यापारी, कार्पोरेट कंपनी, सेवाभावी संस्था यांनी पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.