Sat, Jul 20, 2019 08:33होमपेज › Pune › पालिका पदाधिकार्‍यांच्या गाड्यांची ऑनलाइन खरेदी

पालिका पदाधिकार्‍यांच्या गाड्यांची ऑनलाइन खरेदी

Published On: Jan 18 2018 1:46AM | Last Updated: Jan 18 2018 1:00AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

महापालिकेतील प्रमुख पदाधिकारी आणि अधिकार्‍यांसाठी 9 गाड्या ऑनलाइन पद्धतीने खरेदी करण्यात आल्या आहेत. केंद्राच्या राष्ट्रीय खरेदी धोरणांनुसार गव्हर्नमेंट ई-मार्केट प्लेस (जीईएम) या पोर्टलवरून या गाड्यांची खरेदी करण्यात आली आहे. पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे खरेदी करण्यात आली आहे. या गाड्याची किंमत 66 लाख रूपये असून ऑनलाइन खरेदीमुळे पालिकेच्या तब्बल 33 लाख रुपयांची बचत झाली आहे.

गेल्या पाच ते सहा वर्षांत देशभरात ऑनलाईन शॉपिंगचे प्रमाण वाढले आहे. या शॉपिंगपोर्टलवर एका क्लीकवर नागरिकांना घरबसल्या हव्या त्या वस्तू स्वस्तदरात खरेदी करता येतात. याच धर्तीवर केंद्र शासनाने शासकीय विभागांसाठी गव्हर्नमेंट ई-मार्केट प्लेस सुरू केले आहे. या ऑनलाईन पोर्टलवर शासकीय विभाग तसेच संस्थाना लागणारे हजारो प्रकारचे साहित्य उपलब्ध आहे. 
महापालिकेस आवश्यक वस्तूंची मागणी ऑनलाइन नोंदविल्यानंतर ऑनलाइन निविदा तयार होते. त्यानुसार, या पोर्टलवर असलेली नोंदणीधारक पुरवठादारांमध्ये ऑनलाइन बीड होते. जो पुरवठादार सर्वांत कमी दराने साहित्य देण्यास तयार असेल, त्याच्याकडून महापालिकेस बीडमध्ये ठरलेल्या दरानुसार वस्तू दिल्या जातात. 

याच यंत्रणेचा वापर महापालिकेकडून महापौर, उपमहापौर, स्थायी, विरोधी पक्ष नेते, सभागृह नेता, दोन अतिरिक्त आयुक्त, नगर अभियंता तसेच मुख्य लेखापालांना वापरण्यासाठी नव्या गाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत. स्थायी समितीने ऑक्टोबर 2017 मध्ये या गाडयांच्या खरेदी करण्यास मान्यता दिलेली होती. त्यानुसार, प्रशासनाकडून जीईएम पोर्टलवरून या गाडया खरेदी करण्यात आल्या आहेत. 

पुण्यातील एका डिलरकडून या गाडया देण्यात आल्या असून पालिकेस केवळ 7 लाख 34 हजार रूपयात ही गाडी मिळालेली आहे. तर बाजारात याच गाडीची किंमत ही 11 लाखांच्या आसपास आहे. या पोर्टलवरून खरेदी करण्यात आल्याने या वाहनांना असलेला वेगवेगळा कर तसेच इतर बाबींमध्ये सवलत मिळाली असल्याने ही गाडी स्वस्तात उपलब्ध झाल्याचा दावा, महापालिकेच्या वाहन विभागाकडून करण्यात आला आहे.