Fri, Apr 19, 2019 08:41होमपेज › Pune › ‘वायसीएम’च्या एक्स-रे मशिन दुरुस्तीकडे महापालिकेचे दुर्लक्ष

‘वायसीएम’च्या एक्स-रे मशिन दुरुस्तीकडे महापालिकेचे दुर्लक्ष

Published On: Jun 11 2018 1:07AM | Last Updated: Jun 11 2018 12:23AMपिंपरी : महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामधील 3 एक्स-रे मशिन बंद अवस्थेत आहेत. या मशिन्सच्या दुरुस्तीकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहेत. सध्या एकाच मशिनवर काम चालू आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे.  

वायसीएम रुग्णालयातील एक्स-रे मशिन्स दहा वर्षांपूर्वीच्या आहेत. त्यामुळे सातत्याने त्यामध्ये बिघाड होत आहे. या मशिन्स दुरुस्ती करण्याचे काम खासगी ठेकेदाराकडे दिले होते. संबंधित ठेकेदाराने ही मशिन दुरुस्त करूनही दिली; मात्र पुन्हा त्यामध्ये बिघाड झाला. लाखो रुपये खर्च करूनही या मशिनमध्ये बिघाड कसा झाला? असा सवाल उपस्थित होत आहे. सध्या रुग्णालयात एकूण चार मशिन आहेत. या रुग्णालयात एक्स-रे विभागातील तीन मशिन्स बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे एकाच मशिनवर रुग्णांचे एक्स-रे काढले जात आहेत. एकाच मशिनवर कामकाज सुरू असल्याने नागरिकांना अधिक वेळ ताटकळत उभे रहावे लागत आहे. मशिनच्या देखभाल दुरुस्तीसाठी लाखो रुपयांच्या निविदा काढल्या जात आहेत. खासगी ठेकेदारांकडून या मशिन्सच्या देखभाल दुरूस्तीचे काम दिले जात आहे; मात्र त्यामध्ये पारदर्शीपणा दिसत नाही. बिघडलेली मशिन दुरुस्त करण्यात आली. तरी देखील लगेच त्या मशिन्समध्ये बिघाड झाला. सहा महिन्यानंतरही त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. 

कर्मचार्‍यांकडूनही कामाचा आळस

‘वायसीएम’ रुग्णालयात येणार्‍या रुग्णांची संख्या मोठी असते. दर दिवशी सुमारे 150 रुग्ण एक्स-रे काढण्यासाठी येत असतात. डिजिटल मशिनद्वारे त्वरित एक्स-रे निघत आहेत; मात्र जुन्या मशिनद्वारे एक्स-रे काढण्यासाठी वेळ लागत आहे. त्यामुळे या मशिनमध्ये बिघाड झाल्यानंतर या विभागातील कर्मचारी व विभागप्रमुखही त्याबाबत अनास्थाच दाखवत आहेत.

एकाच ठेकेदाराकडे दुरूस्ती काम का?

महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील मशिन्स दहा वर्षे जुन्या आहेत. त्यामुळे त्यामध्ये सातत्याने बिघाड होत आहे. दुुरूस्तीचे काम घेण्याची इच्छा नसतानाही काम दिले असल्याचे ठेकेदाराकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे इच्छा नसतानाही त्याच ठेकेदाराकडे काम दिले जात आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.