Tue, Apr 23, 2019 10:03होमपेज › Pune › शहरात एकही खड्डा नसल्याचा पालिकेचा दावा

शहरात एकही खड्डा नसल्याचा पालिकेचा दावा

Published On: Dec 08 2017 1:42AM | Last Updated: Dec 08 2017 12:42AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यावर एकही खड्डा अस्तित्वात नाही. रस्त्यावर पडलेले  सर्वच्या सर्व खड्डे बुजविण्यात आले आहेत. या खड्ड्यांची संख्या तब्बल 4 हजार 808 इतकी आहे, असा दावा पिंपरी-चिंचवड महापालिकेने केला आहे.

शहरातील रस्त्यांवर किती खड्डे आहेत, त्याची दुरुस्ती केली का, अशी माहिती माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी महापालिका प्रशासनाकडून मागविली होती. त्यांना उत्तर देताना महापालिकेने असे उत्तर दिले आहे. पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर 29 खड्डे पडले होते. ते सर्व बुजविण्यात आले आहेत. औंध-रावेत रस्ता या मार्गावरील सर्व 40, नाशिक फाटा चौक ते वाकड मार्गावरील सर्व 48, देहू-आळंदी रस्त्यावरील सर्व 80, भोसरीतील टेल्को रस्ता येथील सर्व 15 आणि चिंचवड केएसबी चौक ते थेरगावातील डांगे चौक मार्गावरील सर्व 45 खड्डे तत्परतेने बुजविण्यात आले आहेत, तर काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी मार्गावर एकही खड्डा पडला नसल्याचे महापालिका प्रशासनाने नमूद केले आहे. सदर काम 31 मार्च ते 30 सप्टेंबर 2017 या 6 महिन्यांच्या कालावधीतील आहेत. ते खड्डे बीएम, बीबी किंवा कोल्ड मिक्स, पेव्हिंग ब्लॉक, जीएसबी किंवा मुरूम याद्वारे दुरुस्त केले गेले आहेत. 

शहरातील ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’,‘इ’, ‘फ’, ‘ग’ आणि ‘ह’ या आठही क्षेत्रीय कार्यालय  हद्दीतील वेगवेगळ्या रस्त्यांवर एकूण 4 हजार 551 खड्डे पडले होते. तसेच, बीआरटीएस मार्गावर एकूण 257 खड्डे पडले होते. हे सर्व खड्डे तातडीने बुजविण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाने माहितीमध्ये नमूद केले आहे. दरम्यान, प्रशासनाच्या या उत्तरावर मारुती भापकर यांनी आश्‍चर्य व्यक्त केले आहे.