Tue, Mar 26, 2019 23:53होमपेज › Pune › ‘पीएमपीएमएल’साठी पालिका खरेदी करणार बसेस

‘पीएमपीएमएल’साठी पालिका खरेदी करणार बसेस

Published On: Jul 20 2018 1:12AM | Last Updated: Jul 19 2018 10:23PMपिंपरी : प्रतिनिधी

‘पीएमपीएमएल’कडून बस खरेदीची प्रक्रिया रखडली असून, प्रवाशांसाठी बस उपलब्ध होण्यास विलंब होत आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने बस खरेदी करून ‘पीएमपीएमएल’ला द्याव्यात, असा निर्णय पालिकेच्या स्थायी समितीने आयत्या वेळी घेतला.  मात्र, किती बसेसची खरेदी करावी, याचा उल्लेख केलेला नाही. 

समितीच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड  होत्या. शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी पीएमपीसाठी 1 हजार 550 बस खरेदी करण्याचा निर्णय महापालिका निवडणुकीपूर्वी झाला होता. त्यापैकी 550 वातानुकूलित बसेस एएसआरटीयु या केंद्र शासनाच्या अंगीकृत संस्थेकडून, तर 100 बसेस पुणे व पिंपरी-चिंचवड पालिकामार्फत उपलब्ध करून दिल्या जाणार होत्या. उर्वरित 900 बसेस बसेस मार्केट फायनान्स मॅकॅनिझमप्रमाणे घेण्यास मंजुरी देण्यात आली होती. 

पालिकेने मंजुरी देऊन दोन वर्षे उलटली, तरी बसे खरेदीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. आजपर्यंत ‘पीएमपीएमएल’ने केवळ 200 बस खरेदी केल्याचे समजते. खरेदीला विलंब होत असल्याचा त्याचा ‘पीएमपीएमएल’ बस वाहतुकीवर परिणाम होत आहे. त्यामुळे ‘पीएमपीएमएल’च्या मागणीनुसार पालिकेने लेखा विभागाकडील बसेस खरेदीच्या तरतुदीमधून बसेस खरेदी कराव्यात. बसेस खरेदी करून त्या पीएमपीएमएलला द्याव्यात, असा ठराव ऐनवेळी समितीने मंजूर केला आहे. दरम्यान, धोरणात्मक बाब असल्याने हा प्रस्ताव मंजुरीसाठी पालिका सर्वसाधाररण सभेकडे पाठविला आहे.