Tue, May 21, 2019 04:13होमपेज › Pune › महापालिका आयुक्‍त कुणाल कुमारांची बदली

महापालिका आयुक्‍त कुणाल कुमारांची बदली

Published On: Mar 08 2018 1:20AM | Last Updated: Mar 08 2018 12:59AMपुणे : प्रतिनिधी

केंद्र आणि राज्य शासनास अपेक्षित असणार्‍या समान पाणीपुरवठा, स्मार्ट सिटी, केबल डक्ट, सायकल आदी योजना महापालिकेच्या माध्यमातून राबविताना विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांच्या आणि नागरिकांच्या टीकेचे धनी ठरलेले पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांची दिल्ली येथे केंद्रीय गृहनिर्माण विभागाच्या सहसचिवपदी बदली झाली आहे. आता त्यांच्या जागी कोण येणार, याची 
उत्सुकता आहे.

पुणे महापालिकेत सर्वाधिक काळ म्हणजे पावणे चार वर्षे आयुक्त पदावर राहिलेले कुणाल कुमार यांच्या कार्यकाळात शहरात अनेक  मोठे प्रकल्प सुरू झाले. पुण्याला चोवीस तास पाणीपुरवठा करण्यासाठीचे टेंडर त्यांच्याच कालावधीत निघाले. यासाठी पुणे महापालिकेने दोनशे कोटी रुपये हे खुल्या बाजारातून उभे केले. देशातील हा पहिलाच प्रयोग ठरला होता. ही निविदा जादा दराने वादात अडकली खरी. मात्र फेरनिविदा काढून कुणाल कुमार यांनी त्यातूनही मार्ग काढत ही योजना मंजूर करून घेतली. 

याचबरोबर त्यांच्या कार्यकाळात स्मार्ट सिटी, पुणे मेट्रो, केबल डक्ट, सायकल, नदी सुधार प्रकल्प, नदी काठ सुधार प्रकल्प यांसारख्या मोठ्या प्रकल्पांची शहरात सुरुवात झाली. या  प्रकल्पांना सभागृहाची मंजुरी घेण्यासही ते यशस्वी ठरले आहेत. यापैकी बहुतांश प्रकल्पांची कामे सुरूही झाली आहेत. देशासह, राज्यात आणि पालिकेत सत्तांतर झाल्यानंतर मात्र कुणाल कुमार यांच्यावर भाजपकुमार म्हणून जोरदार टीका झाली. विविध कामांवरून त्यांच्यावर टीकेची झोड उठत असताना न डगमगता कुणाल कुमार यांनी आपला अजेंडा राबविण्याचा शेवटपर्यंत यशस्वी प्रयत्न केला. 

कुणाल कुमार यांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने त्यांची बदली केव्हा होणार, हा शहरातील चर्चेचा विषय झाला होता. अखेर शासनाने कुणाल कुमार यांची बुधवारी केंद्रीय गृहनिर्माण विभागाच्या सहसचिवपदी बदली केली. त्यांच्या जागी कोण येणार, याकडे आता पुणेकरांचे आणि राजकीय नेतेमंडळीचे लक्ष लागले आहे. 

रुजू होण्याआधीच अतिरिक्‍त आयुक्‍तांची बदली

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली झालेले कौस्तुभ दिवेगावकर हे पालिकेत रुजू होण्याआधीच त्यांची बदली झाली आहे. लातूरच्या आयुक्तपदी त्यांची बदली करण्यात आली आहे, त्यामुळे पालिकेतील अतिरिक्त आयुक्तपद रिक्त राहणार आहे. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांची बदली झाली. त्यांच्या जागी जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या बदलीचे आदेश राज्य शासनाने गत आठवड्यात काढले होते. मात्र, ते पालिकेत रुजू होण्याआधीच मंगळवारी शासनाने  लातूर महापालिकेच्या आयुक्त पदी बदलीचे आदेश काढले. 

पुण्यातील कामाबाबत समाधानी : कुणाल कुमार

पुण्यातील आयुक्तपदाचा कारभार माझ्यासाठी समाधानकारक राहिला. अनेक योजनांमध्ये माझा सहभाग राहिला, याचा आनंद आहे. शहरात काम करताना काही आव्हाने पेलावी लागली. पुण्यातील अनुभव माझ्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. केंद्र शासनाने माझ्या बदलीचे आदेश काढले आहेत. बदलीचे आदेश राज्य शासनाकडे आल्यानंतरच बदलीची प्रक्रिया पूर्ण होईल, असे कुणाल कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.