Tue, Mar 19, 2019 20:28होमपेज › Pune › सत्ताकाळात तरी मुंडे यांचे तैलचित्र पालिकेत लागणार का?

सत्ताकाळात तरी मुंडे यांचे तैलचित्र पालिकेत लागणार का?

Published On: Aug 26 2018 1:29AM | Last Updated: Aug 26 2018 1:24AMपिंपरी : संजय शिंदे

पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची एकहाती सत्ता आहे. पालिकेच्या सभागृहामध्ये विविध महापुरुष आणि नेत्यांची 15 तैलचित्रे लावण्यात आली आहेत. 17 जून 2014 मध्ये गोपीनाथ मुंडे यांचे तैलचित्र लावण्यात यावे, याबाबत ठराव मंजूर करण्यात आला होता. त्याला जवळपास चार वर्षे उलटली आहेत. राज्यात आणि पालिकेत भाजपाची सत्ता आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेवर कमळ फुलावे त्या अनुषंगाने वारंवार शहराच्या पक्षांतर्गत प्रश्‍नाकडे हयात होते तोपर्यंत मुंडे जातीने ते लक्ष देत होते. किमान त्यांच्या पश्‍चात सत्ताकाळात पालिका सभागृहात त्यांचे तैलचित्र लागणे आवश्यक असल्याच्या भावना मुंडे समर्थकांमध्ये व्यक्त होत आहेत.

पालिका सभागृहांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, महात्मा फुले, राजर्षी शाहु महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, भारतरत्न राजीव गांधी, अण्णासाहेब मगर, अण्णासाहेब पाटील, प्रा. रामकृष्ण मोरे ही तैलचित्रे 25 मे 2009 पर्यंत तर 6 मार्च 2015 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे अशी पंधरा तैलचित्रे बसविण्यात आली आहेत. मुंडे यांचे तैलचित्र लावण्यात यावे असा तत्कालीन प्रदेश सदस्य बाळासाहेब गव्हाणे यांनी 2014 मध्ये  विषय मांडला होता. त्याच्यासाठी पालिकेत ठराव करण्यात आला होता. सदर परिपत्रकान्वये एकुण 24 छायाचित्रांना मान्यता देण्यात आली आहे; परंतु महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास व जलसंधारण विभागाकडील परिपत्रकअन्वये शासकीय/निमशासकीय कार्यालयात कोणकोणत्या राष्ट्रीय/ राज्यस्तरीय नेत्यांची छायाचित्रे लावावीत याबाबत सूचना दिल्या होत्या.त्यानंतर स्थापत्य विभागाने पालिका सभागृहांमध्ये दोनच तैलचित्रे बसविणेस जागा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्वपूर्ण योगदान देणार्‍या क्रांतीवीर चापेकर बंधु व हिंदहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र  6 मार्च 2017 मध्ये बसविण्यात आले होते. 

किमान आता राज्यात आणि पालिकेत भाजपाची एक हाती सत्ता आहे. पिंपरी-चिंचवड हा गोपीनाथ मुंडे यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. येथील नागरिकांना सोयी-सुविधा मिळाल्या पाहिजेत, सर्वसामन्य कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी सत्ताकाळात आणि त्यानंतर ही मुंडे यांनी नेहमीच प्राधान्य दिले होते हे सर्व पक्षीय राजकारणी मान्य करतात. त्यामुळे मुंडे यांचे तैलचित्र सभागृहात बसविण्याच्यादृष्टीने सत्ताधारी भाजपाने प्रयत्न केले पाहिजेत.