Thu, Apr 25, 2019 18:30होमपेज › Pune › डीएसकेंच्या ताब्यासाठी मुंबई, कोल्हापूर पोलिस प्रयत्नशील

डीएसकेंच्या ताब्यासाठी मुंबई, कोल्हापूर पोलिस प्रयत्नशील

Published On: Mar 01 2018 1:29AM | Last Updated: Mar 01 2018 1:27AMपुणे : प्रतिनिधी

ठेवीदारांचे पैसे परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या अटकेत असणार्‍या डीएसकेंचा ताबा मुंबई आणि कोल्हापूर पोलिस घेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. गुरुवारी (दि. 1) डीएसकेंची पोलिस कोठडीची मुदत संपत आहे. दरम्यान, बुधवारी डीएसके यांच्या आलिशान कारमधील आणखी ऑडी कार जप्त केली आहे. तर, आर्थिक गुन्हे शाखेला आठ दिवसांमध्ये डीएसकेंकडून थोडी माहिती मिळाली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान, कोल्हापूर पोलिस डीएसकेंचा ताबा प्रथम घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

शिवाजीनगर पोलिस ठाण्यात डी.  एस. कुलकर्णी, पत्नी हेमंती कुलकर्णी व मुलगा शिरीष कुलकर्णी यांच्यावर ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. डीएसके पैसे भरण्यास असमर्थ ठरल्याने न्यायालयाने त्यांचे अटकेपासूनचे संरक्षण काढले. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना अटक केली. प्रकृतीच्या कारणावरून डीएसके चार दिवस रुग्णालयात होते. त्यानंतर डीएसके दाम्पत्याला 1 मार्चपयर्र्ंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाकडून डीएसकेंकडे तपास करण्यात येत आहे.

मात्र त्यांच्याकडून सहकार्य मिळत नाही. त्यामुळे  जप्त  कागदपत्रांवरून तपास केला.  सोमवारी डीएसकें यांच्या पाच आलिशान कार आणि एक दुचाकी जप्त केली होती.  तर, बुधवारी ऑडी कार जप्त केली आहे. या वाहनांची किंमत साडे सहा कोटींच्या जवळपास आहे.  जंगली महाराज रस्त्यावरील  त्यांच्या मुख्य ऑफिसमध्ये झडती घेऊन  जप्त कागदपत्रावरून तपास सुरू आहे.  कोठडीची मुदत गुरुवारी संपत आहे. त्यांच्याविरोधात मुंबई व कोल्हापूर शहरात गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या ठिकाणच्या पोलिसांकडून डीएसके यांचा ताबा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याबाबत विचारले असता, सह पोलिस आयुक्क्त डीएसके यांना अटक केल्यानंतर त्याची माहिती गुन्हे दाखल असणार्‍या ठिकाणच्या पोलिसांना देण्यात आली आहे, असे सांगितले. 

डीएसकेंकडे एकूण 35 वाहने 

आर्थिक गुन्हे शाखेने डीएसकेंना अटक केल्यानंतर तपासादरम्यान सोमवारी त्यांच्या आलिशान पाच कार आणि 1 दुचाकी जप्त केली. तर, बुधवारी एक ऑडी कार जप्त केली आहे. मात्र, डीएसकेंकडे आणखी 30 ते 35 वाहने असल्याची माहिती पोलिसांकडून दिली. त्यामुळे ही वाहनेही जप्त होण्याची शक्यता आहे. 

‘ईडी’कडून चौकशी सुरू

पुण्यात डीएसकेंविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांकडून ईडीला (सक्तवसुली संचालनालयाला) देण्यात आली होती. आता डीएसके यांना अटक केल्यानंतर ईडीकडून त्यांनी केलेल्या व्यवहाराची माहिती घेतली जात आहे. डीएसके यांनी परदेशात पैसा वळविला आहे का, याचा तपास केला जात आहे; तसेच काही संशयास्पद व्यवहाराची देखील माहिती घेतली जात आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली.