Fri, May 24, 2019 20:31होमपेज › Pune › बालेवाडीतील ‘मल्टिमोडल ट्रान्झिट हब’ला गती

बालेवाडीतील ‘मल्टिमोडल ट्रान्झिट हब’ला गती

Published On: Jul 19 2018 1:38AM | Last Updated: Jul 19 2018 12:57AMपुणे : प्रतिनिधी

बालेवाडी येथे ‘मल्टिमोडल ट्रान्झिट हब उभारण्यासाठी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून (पीएसडीसीएल) महापालिकेकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी तब्बल साडेबाराशे कोटींचा खर्च येणार असून सार्वजनिक खासगी भागिदारी (पीपीपी) या तत्वावर हे ट्रान्झिट हब उभारण्याचे नियोजन आहे. त्यासाठी येथील जकात नाक्याची मोक्याची जागेची मागणी महापालिकेकडे केली आहे.

केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत बाणेर-बालेवाडी-औंध या भागाची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार या भागात या योजनेच्या माध्यमातून विविध प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यात या भागात ‘मल्टिमोडल ट्रान्झिट हब’च्या महत्वकांक्षी प्रकल्पाचा समावेश आहे. बालेवाडीतील सर्व्हे क्र 25 येथील जाकात नाक्याची तब्बल 11 एकर मोक्याची जागा आहे. या जागेवर हा प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. गत महिन्यात पीएसडीसीएलच्या संचालक मंडळाच्या बैठकीत  या प्रकल्पासाठी इरादा (एक्सप्रेशन ऑफ़ इंट्ररेस्ट) मागविण्यास मंजुरी दिली. त्यानुसार स्मार्ट सिटीकडून या प्रकल्पाचा प्रस्ताव काही मंजुर्‍यांसाठी पालिकेकडे पाठविण्यात आला आहे. या ट्रान्झिट हबसाठी तब्बल 1 हजार 251 कोटींचा खर्च येणार आहे. त्यातून पालिकेला जवळपास 600 कोटींचा फायदा होणार आहे. या प्रकल्पासाठी पीएसडीसीएलने महापालिककडे विविध परवानग्यांची मागणी केली आहे.

त्यात प्रामुख्याने या जागेचे आरक्षण बदलून ते व्यावसायिक करणे, या जागेचा व्यावसायिक वापर करण्याचे आणि त्याचे नियोजन करण्याचे तसेच ही जागा 60 वर्षे भाडेतत्वावर देण्यास मंज़ुरी मिळावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर हा प्रकल्प उभारण्यासाठी तब्बल 280 कोटींचा प्रिमिअम एफएसआय लागणार आहे, तो पालिकेने माफ करावा अशा मागणीचाही त्यात समावेश आहे. मुख्यसभेच्या मंजुरीने यासर्व परवानग्या देण्यात यावी अशी मागणी त्यात करण्यात आली आहे. दरम्यान या परवानग्यांसाठी तब्बल सहावेळा पीएसडीसीएलकडून पालिकेला पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. मात्र, त्यावर कार्यवाही होऊ शकलेली नाही.

असे असणार मल्टिमोडल ट्रान्झिट हब

तब्बल 19 लाख चौरस फुट बांधकामाचे क्षेत्र असलेल्या या हबमध्ये पीएमआरडीएच्या हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो मागाचे स्ट्रेशन, बीआरटी, एसटी, रिक्षा, खासगी प्रवासी टॅक्सी यांचे एकत्रित स्थानके असणार असणार आहेत. त्यावर व्यावसायिक कार्यालय उभारण्यात येणार आहे. त्यात मल्टिप्लेक्सचा समावेश असणार आहे.

हबसाठी इरादा जाहीर

या प्रकल्पासाठी स्मार्ट सिटी कंपनीकडून एक्सप्रेशन ऑफ़ इंटरेस्ट (इरादा) मागविण्यात आला आहे. त्यासाठी एका महिन्याची म्हणजेच 17 ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.