Wed, Apr 24, 2019 08:01होमपेज › Pune › मालेगावची ‘मोसम’ स्वच्छ; मुळा-मुठा गटारगंगाच!

मालेगावची ‘मोसम’ स्वच्छ; मुळा-मुठा गटारगंगाच!

Published On: Apr 08 2018 2:15AM | Last Updated: Apr 08 2018 1:13AMपुणे : देवेंद्र जैन 

राज्यातील ‘ड’ वर्ग असलेल्या मालेगाव येथील महानगरपालिकेने त्यांच्या हद्दीत असलेली मोसम नदी परिसर स्वच्छ करून स्वच्छतेच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. विशेष म्हणजे, गटारगंगा अशीच काहीशी ओळख असलेल्या मोसम नदीचा, राज्यमंत्री दादा भुसे व महानगरपालिका आयुक्त संगीता धायगुडे यांच्या पुढाकाराने फक्त चार महिन्यांत कायापालट  झाला असून या नदी किनार्‍यावर  आता चकाचक चौपाटी व सेल्फी पाँईंट तयार करण्यात आले आहेत. या उलट मोठा गाजावाजा करून नदी स्वच्छता अभियानातंर्गत मुळा नदी स्वच्छतेसाठी  विनापरतफेड 1000 कोटी ऐवढी मोठी रक्कम मिळाली.असतानाही तब्बल 26 महिन्यांनंतरही  पुण्यातील मुळा-मुठा गटारगंगाच राहिली असल्याचे दुर्देवी चित्र आहे.  

गटारगंगा म्हणूनच बदनाम ठरलेल्या मोसम नदीला स्वच्छ करण्याचा संकल्प स्वत: राज्यमंत्री दादा भुसे, अविष्कार भुसे व या ‘ड’ वर्ग असलेल्या महानगरपालिकेच्या आयुक्त संगीता धायगुडे यांनी केला. आणि कामाला सुरुवात झाली. पर्यावरणाचा समतोल राखून व भविष्यात पडणार्‍या  पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करून, अंदाजे 3 किलोमीटर किनारा स्वच्छ करण्यात आला. ही स्वच्छता मोहीम ऐवढ्यावरच थांबली नाही. अहमदाबाद येथील साबरमतीच्या सुशोभित किनार्‍याप्रमाणे हा किनारा करण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यात येत आहेत. मालेगाव मनपाआयुक्त संगीता धायगुडे यांनी या मोहिमेकरिता सर्व प्रकारची यंत्रे व वाहने उपलब्ध करून दिली होती. या मोहिमेसाठी नागरिकांच्या कर रुपी पैशाचा वापर न करता, राज्यमंत्री दादा भुसे यांनी स्वतःच्या विकास निधी दिला. 

यासंदर्भात घायगुडे म्हणाल्या की, या स्वच्छता मोहिमेकरिता मी व माझ्या सर्व सहकार्‍यांनी आणि स्वतः राज्य मंत्री महोदयांनी खूप परिश्रम घेतले.  मालेगावमध्ये प्रवेश करताना ज्या मोसम नदी मधील गटारगंगेच्या दुर्गंधीने नागरिकांचे स्वागत व्हायचे तेथे आज सुंदर चौपाटी व सेल्फी पाँईंट आम्ही तयार केलाआहे. या ठिकाणी नागरिक व मुले आनंद घेत असताना पाहून  अनेकांना विश्‍वास बसत नाही. आता तर अहिल्याबाई पुलावर लाईट ईफेक्टसने शहराच्या सौंदर्यात मोठी भर पडली आहे.  आम्हाला राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेतंर्गत सरकारने मदत केल्यास पुढील काही दिवसात आमचे शहर राज्यामध्ये पहिला नंबर पटकावेल, असा विश्‍वासही धायगुडे यांनी व्यक्त केला.. 

शिवसेनेचे राज्यमंत्री दादा भुसे म्हणाले की, मालेगाव म्हटले की लोक विचित्र नजरेने पहायचे; पण आज येथील स्थानिक नागरिक स्वत: शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी  प्रयत्न करत आहेत. पुणे महानगरपालिकेला जसा एक हजार कोटीचा निधी मिळाला तसा राज्य सरकार अथवा केंद्र सरकारने आम्हालाही अधिक निधी उपलब्ध करुन द्यावा. आम्ही ज्या प्रकारे मोसम नदीचा फक्त चार महिन्यात कायापालट केला आहे, तो पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी याची नक्कीच दखल घेतील व राहिलेले काम आम्हाला पूर्ण करण्यास मदत करतील, असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पुणे महानगरपालिकेला 26 महिन्यांपूर्वी मुळा-मुठेच्या स्वच्छतेसाठी  1000 कोटी रुपये मिळाले; पण त्यांना नदी 26 फुट सुद्धा स्वच्छ करता आली नाही. मालेगाव महानगरपालिका व तेथील राज्य मंत्र्यांनी सरकारी मदतीची अपेक्षा न करता मोसम नदीचा कायापालट करून दाखवला. पुणे शहरात तर 8 आमदार, दोन मंत्री, दोन खासदार तसेच 1 केंद्रीय मंत्री आहेत.  मनपामध्येही भाजपची सत्ता आहे. मात्र शहराकरिता काम करण्याची मानसिकताच नाही असे दिसते. सर्व पायाभूत सुविधा, ट्रक, जेसीबी, पोकलेन, डम्पर, या पुणे महानगरपालिकेच्या मालकीच्या आहेत. तसेच निधी भरपूर, असे असतानाही 26 महिन्यात काय केले, तर फक्त एजन्सीची नेमणूक. याला सत्ताधारी नगरसेवकांबरोबरच विरोधी पक्षातील सर्व नगरसेवक जवाबदार आहेत. कोणालाच आपली नदी स्वच्छ करावयाची नाही, असेच चित्र सध्या दिसत आहे. 

 

Tags : pune, pune news, Mula Mutha river,