Mon, Apr 22, 2019 21:39होमपेज › Pune › ड्रायव्हिंग स्कूलचालकांचा नियमांना कोलदांडा

ड्रायव्हिंग स्कूलचालकांचा नियमांना कोलदांडा

Published On: Feb 24 2018 1:13AM | Last Updated: Feb 23 2018 10:32PMपुणे : नवनाथ शिंदे

शहरातील खासगी मोटार ड्रायव्हिंग स्कूलमालकांकडून मोटार वाहन कायद्याचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. विशेषतः नागरिकांना चारचाकी वाहनाचे प्रशिक्षण देण्यासाठी चक्क नियमबाह्य जुन्या वाहनांचा वापर केला जात आहे; तसेच प्रशिक्षित मार्गदर्शक उपलब्ध न करणे, अर्जदाराला वाहन प्रशिक्षणाअगोदर दृकश्राव्य लघुपटाची माहिती न दाखविणे, नागरिकांना रस्ता सुरक्षा आणि वाहतुकीच्या नियमाबद्दल थेट वाहन प्रशिक्षण देताना माहिती देणे, तर वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करणार्‍या शेकडो ड्रायव्हिंग स्कूलवर आरटीओ आणि वाहतूक विभाग मेहेरबान असल्याचे आढळून येत आहे.

मोटार वाहन कायद्यानुसार ड्रायव्हिंग स्कूलद्वारे नागरिकांना वाहन चालविण्याचे धडे देणार्‍या प्रत्येक संस्थेची नोंदणी आरटीओ कार्यालयात होणे बंधनकारक आहे. तसेच अर्जदाराला वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यापुर्वी त्याला वाहतुकीचे नियम, रस्त्यावरील सांकेतिक चिन्हांचा अर्थ समजावून सांगणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रशिक्षण संस्थेत नियमांचे तक्ते, चित्रफीत, मार्गदर्शक पुस्तिका, रस्त्यावरील सिग्नलची संपूर्ण माहिती अद्ययावयत असणे गरजेचे आहे; तसेच दोन कंट्रोल असलेल्या नवीन वाहनातून नागरिकांना प्रशिक्षित मार्गदर्शकाद्वारे वाहन चालविण्याचे धडे देण्यासाठी संस्था बांधिल आहेत;

मात्र शहरातील बहुतांश ड्रायव्हिंग स्कूलमालकांकडून वाहतुकीच्या नियमांसह मोटार वाहन कायद्याचे पालन केले जात नाही.  पुणे शहरात जवळपास 250 ते 300 ड्रायव्हिंग स्कूल कार्यरत आहेत. अनेक ड्रायव्हिंग संस्थांकडून फक्त खिसे भरण्यासाठी नागरिकांना जुजबी आणि अप्रगत शिक्षण दिले जात आहे. मोटार वाहन नियमानुसार प्रत्येक प्रशिक्षणार्थीला किमान 12 तासांचे वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यासाठी दिवसाला साधारणतः अर्ध्या तासाचे  प्रशिक्षण अर्जदाराला देणे आवश्यक आहे; मात्र अनेक ड्रायव्हिंग स्कूलवाल्यांकडून प्रशिक्षण कालावधी पूर्ण करण्याऐवजी दररोज फक्त 10 ते 15 मिनिटे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामध्ये एकाच वाहनात तीन ते चार नागरिकांना बसवून मोटार वाहन नियमांना बगल देत प्रशिक्षणाचा कालावधी आटोपला जात आहे. 

प्रशिक्षणासाठी वापरण्यात येणार्‍या वाहनांवर कोणत्याही प्रकारच्या सांकेतिक खुणा नसल्याचे आढळून येत आहे. विशेषतः वाहनांवर काळी-पिवळी पट्टी नसणे, एल आकाराचे चिन्ह, चालक शिकत असल्याचा बोर्ड लावता जात नाही. अशा वाहतुकीच्या नियमांना फाटा देत प्रशिक्षण देणार्‍या ड्रायव्हिंग स्कूलवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे; तसेच जुन्या आणि नियमबाह्य वाहनातून अप्रगत प्रशिक्षणाद्वारे तुंबड्या भरणार्‍या वाहन प्रशिक्षण संस्थेवर आरटीओ कार्यालयाने कारवाईचा बडगा उगारण्याची मागणी करण्यात येत आहे.