Wed, Jul 24, 2019 07:50होमपेज › Pune › मोशी-आळंदी बीआरटी मार्गात अखेर गतिरोधक

मोशी-आळंदी बीआरटी मार्गात अखेर गतिरोधक

Published On: Jan 19 2018 1:56AM | Last Updated: Jan 18 2018 11:39PMमोशी ः श्रीकांत बोरावके 

तीर्थक्षेत्र देहू-आळंदीला गतीने जोडणारा नवीन बीआरटीएस रस्ता काही तांत्रिक बाबींच्या अभावा मुळे मृत्यूचा सापळा बनत असून या मार्गावर अपघात ही नित्याचीच बाब झाली आहे. गतिरोधक  नसल्याने अपघातात वाढ होत असल्याचे वृत्त दै. ‘पुढारी’त प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेत तत्काळ प्रशासनाच्या वतीने हालचाल करत गतिरोधक बसविण्याचे काम मार्गी लावण्यात आले असून, सध्या बीआरटीएस रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची कामे सुरु आहेत. या कामासाठी नगरसेवक, क्रीडा समिती सभापती लक्ष्मण सस्ते यांनी विशेष पाठपुरावा केला होता.

वेगवान वाहतुकीमुळे रस्त्यालगतच्या रहिवासी सोसायट्या, वाड्या-वस्त्यांमधील नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे. या रस्त्यावर ऑस्टिया सोसायटीलगत धोकादायक वळण असून त्यावर गतिरोधक नसल्याने वाहने सुसाट जात असतात. वळणाचा अंदाज न आल्याने अनेकदा अपघात होतात. काही वेळा गंभीर अपघात होऊन काहींना जीव देखील गमवावा लागला आहे. येथील रहिवाशांनी प्रशासनाकडे याबाबत अनेकदा पत्रव्यवहार करून देखील त्याची दाखल घेतली जात नसल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत होते. अखेर ‘पुढारी’ने याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध करत या समस्येचे गांभीर्य अधोरेखित केले होते.

प्रशासन सदर रस्त्यावर गतिरोधक टाकता येत नसल्याची सबब देत असले तरी याच रस्त्यावर देहू रस्ता, डुडुळगाव आदी ठिकाणी गतिरोधक टाकले आहेत. तिथे टाकता येऊ शकतात, मग धोकादायक वळणावर का नाही, असा प्रश्न ‘पुढारी’ने वृत्तातून उपस्थित केला होता. अखेर नगरसेवक सस्ते यांच्या सूचनेनुसार प्रशासनाने हे काम हाती घेतले आहे. 
देहू ते आळंदी दरम्यान अनेक ठिकाणी रस्ता दुभाजक आहेत. या दुभाजकांचा वापर देखील अधिक होतो परंतु, या दुभाजकांच्या दोन्ही बाजूस गतिरोधक नसल्याने सरळ रस्त्यावरून गाड्या सुसाट येतात.

वळणार्‍या गाडयांना समोरून येणार्‍या गाडीचा अंदाज न आल्याने अनेकदा अपघात होतात. यामुळे अशा दुभाजकांच्या दोन्ही बाजूस नियमाप्रमाणे गतिरोधक बसवावेत, अशी मागणी होत होती. ऑस्टिया सोसायटी ही साधारण पाचशे सदनिकांची सोसायटी असून त्यात राहणारे नागरिक येथील दुभाजकांचा वापर करत असतात, परंतु गतिरोधक नसल्याने समोरून येणार्‍या वाहनांच्या वेगावर नियंत्रण राहत नाही. परिणामी अपघातांच्या संख्येत वाढ होत होती. अखेर प्रशासनाने गतिरोधक बसविण्यास सुरुवात केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.