Sat, Mar 23, 2019 16:07होमपेज › Pune › सकाळी हेरलं जातंय सावज!

सकाळी हेरलं जातंय सावज!

Published On: Aug 21 2018 1:38AM | Last Updated: Aug 21 2018 12:53AMपुणे : पुष्कराज दांडेकर 

घटना क्र. 1 - सकाळी साडेसहाची वेळ.... रस्त्यावर वाहनांची गर्दी नाही. महिला दुचाकीवरून बिबवेवाडी येथून दांडेकर पुलाकडे जात असताना सारसबागेजवळील स्वामी समर्थ मंदिरराजवळ आल्यावर पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. 

घटना क्र. 2 - सकाळी साडेसातची वेळ.... शाळेला आणि कामावर जाण्याची वेळ...नगर रस्त्यावरून महिला कामावर जाण्यासाठी दुचाकीवरून निघाली आणि अचानक हयात हॉटेल चौकात आल्यावर महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्यात आले. दुचाकीवरून आलेल्यांनी महिलेला जोराचा हिसका दिला. महिलेनेही पाठलाग केला, मात्र ते वेगात निघून गेले. 

घटना क्र. 3 - कर्वेनगर येथे 74 वर्षीय महिला मॉर्निंग वॉकसाठी जात होती. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्याने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसका मारून तोडून नेले.या घटना शहरात दिवसेंदिवस वाढत जात आहेत. मागील सात महिन्यांत शहरात 100 पेक्षा जास्त सोनसाखळी हिसकावल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या घटनांमध्ये चोरट्यांनी महिलांच्या लाखो रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. विशेष म्हणजे हे चोरटे सकाळच्या व कमी गर्दीच्या वेळी सक्रिय असल्याचे आढळून आले आहे. 

दुचाकीवरून येऊन महिलांची सोनसाखळी चोरण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सण, उत्सवांच्या वेळीच दागदागिने परिधान करून येणार्‍या महिलांना चोरटे लक्ष्य करतात. वटपौर्णिमेच्या दिवशीही चोरट्यांनी एका दिवसातच तब्बल 12 ठिकाणी महिलांचे मंगळसूत्र व सोनसाखळ्या हिसकावल्याचा प्रकार ताजाच आहे. सकाळी सात ते दुपारी एकपर्यंत या चोरट्यांनी शहरभर सोनसाखळी चोर्‍या केल्या. मात्र आता या चोरट्यांनी मॉर्निंग वॉकला निघालेल्या, ज्येष्ठ महिला आणि दुचाकीवरून कामावर निघालेल्या महिलांना टार्गेट केले आहे. सकाळी रस्त्यांवर वाहनांची, लोकांची गर्दी कमी असते. त्यामुळे त्यांना पळून जाण्यात अडथळा कमी असतो. तसेच सकाळच्या वेळी पोलिसांची गस्तही कमी असते. 

स्वारगेट आणि येरवडा  परिसरातील दोन घटना लक्षात घेता पुण्यातील नोकरदार महिलांनाही आता सोनसाखळी चोरांची धास्ती आहे. दुचाकीवरून जाताना सोनसाखळी आणि पर्स हिसकावण्याच्या घटनाही शहरात वाढल्या आहेत. 

सकाळची गस्त वाढविण्याची गरज

पोलिसांची गस्त रात्रभर असते. रात्रीची गस्त पहाटेच्या सुमारास हळूहळू कमी होते. त्यामुळे पहाटे आणि सकाळची वेळ चोरट्यांसाठी पसार होण्यासाठी सोपी ठरत आहे. या काळात पोलिसांनी गस्त वाढवण्याची आवश्यकता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.  जॉगिंग पार्क आणि सकाळी नोकरदारांची गर्दी असलेल्या रस्त्यांवरही पोलिस उभे असतील तर सोनसाखळी चोरटे हिम्मत करणार नाहीत. पुण्याच्या नवनियुक्त पोलिस आयुक्तांची व्हिजीबल पोलिसिंगसाठी पथके आणि जीपीएस यंत्रणा असलेल्या वाहनांच्या गस्तीचा नवा उपक्रम राबविण्याची योजना आहे. स्ट्रीट क्राईमला आवर घालण्यासाठी हा उपक्रम असणार आहे.